चालक-वाहकांची समयसुचकता;बस नेली थेट रुग्णालयात
बीड । वार्ताहर
धावत्या एसटी बसमध्ये एका वृध्द प्रवाशी महिलेला ह्रदयविकाराचा तीव्र त्रास होवू लागला. बसमधील इतर प्रवाशी व चालक-वाहकाला हे लक्षात येताच त्यांनी एसटी बस थेट जिल्हा शासकीय रुग्णालयात नेत तातडीने त्या वृध्द महिलेला उपचार मिळवून दिले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, आरोग्य कर्मचार्यांनी तातडीने महिलेवर उपचार सुरु केले. चालक-वाहकांनी दाखवलेल्या समयसूचकतेचे रुग्णालयात अनेकांनी कौतूक केले. महिलेवर उपचार सुरु असून प्रकृती स्थीर असल्याचे सांगण्यात आले.
नसिबा कडू शेख (वय 70, रा. ता. पाथर्डी, जि.अहिल्यानगर) असे त्या रुग्ण महिलेचे नाव आहे. सदरील महिला आष्टी येथे त्यांच्या मोठ्या मुलीला भेटण्यासाठी गेल्या होत्या. नंतर तेथून शनिवारी (दि.16) सकाळी त्या आष्टी येथून पुणे-बीड क्र.(एम.एच.14 बी.टी. 4105) या शिरुर घोडनदी येथील आगाराच्या एसटी बसमधून बीडला येत होत्या. बीडहून त्या गेवराई येथे त्यांच्या दुसर्या एका मुलीच्या घरी जात होत्याा. दरम्यान बस बीड शहरातील नगर रोडवर आलेली असताना त्यांना ह्रदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने बसमध्येच अस्वस्थ झाल्या.
त्यांची ही स्थिती पाहून प्रवाशांनी वाहक-चालकाला कल्पना दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत बस चालक चंद्रकांत फड व वाहक सुशेन वाघमारे यांनी नगर रोडहून बस थेट जिल्हा रुग्णालयापर्यंत आणली. तेथून तातडीने प्रवाशांच्या मदतीने नसिबा शेख यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. नंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले. नंतर वाहक-चालकांनीच महिलेच्या नातेवाईकांना फोनव्दारे माहिती देत तात्काळ जिल्हा रुग्णालयात येण्याचे कळवले. काही वेळानंतर महिलेचे जावाई व नातू जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. डॉक्टरांच्या निगराणीखाली नसिबा शेख यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Leave a comment