बीड । सुशील देशमुख
केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम, शेतकर्यांसाठी पीएम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याच्या फाइलवर स्वाक्षरी केली होती.त्यानंतर आता पीएम किसान सन्मान योजनेच्या 17 व्या हप्त्याचा लाभ येत्या 18 जून रोजी वितरित केला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात या योजनेच्या लाभासाठी पात्र शेतकर्यांची नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बैंक खाती आधार क्रमांकास जोडणे ही सर्व प्रक्रिया गत काही महिन्यांपासून सुरु असलेल्या मोहिमेतून पुर्ण केली गेली आहे. जिल्ह्यातील 3 लाख 78 हजार शेतकर्यांना ‘पीएम किसान’ सन्मान निधीचा सतरावा हप्ता वितरित होणार आहे.
‘पीएम किसान सन्मान निधी’ या योजनेंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी तीन हप्त्यात प्रत्येकी दोन हजार या प्रमाणे 6 हजार रुपयांचा लाभ दिला जातो. ई- केवायसी केलेले शेतकरी कुटुंब पीएम किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. या योजनेच्या लाभासाठी बीड जिल्ह्यातील 3 लाख 78 हजार शेतकरी पात्र असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यात ई-केवायएसी प्रक्रिया पुर्ण न केल्यामुळे तसेच इतर कारणांमुळे काही महिन्यांपूर्वी ही संख्या 3 लाख 76 हजार 249 इतकी होती. नंतर त्यात वाढ झाली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी ई- केवायसी करणे आवश्यक आहे. बीड जिल्ह्यात अद्यापही काही शेतकर्यांनी अद्यापही ई- केवायसी केलेली नाही.
असे शोधा नाव
लिस्टमध्ये नाव चेक करण्यासाठी शेतकर्यांनी सर्वप्रथम पीएम किसानची अधिकृत संकेतस्थळ www.pmkisan.gov.in वर जावे. आता होमपेजवर ’लाभार्थी लिस्ट’च्या टॅबवर क्लिक करा.यानंतर, डिटेल्स सिलेक्ट करुन राज्य, जिल्हा, गांव सिलेक्ट करावे. त्यानंतर रिपोर्ट टॅबवर क्लिक करा.यानंतर आपल्याला लाभार्थी लिस्ट दिसेल. यात आपण आपले नाव शोधता येईल.
Leave a comment