आरोग्य विमा व्यवस्थापकाची केली होती लाखोंची लुट;ऑनलाईन साडेआठ लाखांचे कर्जही काढण्यासही केले मजबूर

फरार म्होरक्याचा शोध सुरु; बीड एलसीबीची उल्लेखनिय कामगिरी चोरट्यांकडून 4 लाखांची रक्कम हस्तगत

बीड । वार्ताहर

आरोग्य विमा कंपनीचे प्रशिक्षण उरकून पुण्याहून हडपसरमार्गे लातूरकडे परतणार्‍या एका आरोग्य विमा व्यवस्थापकाला लिफ्ट देण्याच्या  बहाण्याने कारमध्ये बसवून नंतर त्याचे खंडणी वसुलीसाठी तब्बल 22 तास डांबून ठेवले होते. पाटोदा तालुक्यातील अमंळनेर ठाणे हद्दीत डोंगरालगत 21 मे रोजी ही घटना घडली होती. तीन आरोपींनी अगदी सिनेस्टाईल पध्दतीने गुन्ह्याची नवीन पध्दत अवलंबत पिस्टलचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी देवून संबधिताकडून तब्बल साडेआठ लाखांचे ऑनलाईन कर्ज मंजूर करुन घेतले. तसेच मित्राकडून आणखी 7 लाख आणण्यास भाग पाडले. स्वत:ची सुटका करुन घेत संबधित व्यक्तीने पुण्यातील हडपसर ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर हा गुन्हा अंमळनेर पोलीसांकडे वर्ग झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय  क्लिष्ट गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करत यातील दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या अन्य एक साथीदार फरार असून तोच या टोळीचा म्होरक्या आहे.


पोलीसांच्या माहितीनुसार, प्रविण बाबासाहेब काकडे (वय 32),  विलास रामा शिंदे (वय 32, दोन्ही रा. गोमळवाडा,शिरुर कासार) अशी गजाआड करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर बालाजी शंकरराव कोपरे (वय 43, रा.वासनगाव,ता.जि.लातूर) असे डांबून ठेवून लुटमार करण्यात आलेल्या फिर्यादीचे नाव आहे.  कोपरे हे 21 मे रोजी पुणे येथे त्यांच्या इंश्युरंस कंपनीचे प्रशिक्षण असल्याने ते पुणे येथे ट्रॅव्हल्सने गेले होते. दिवसभर काम करुन परत लातुरकडे येण्यासाठी हडपसर पुणे प्रवासी स्टॅापवर बसची वाट पाहत थांबले असतांना त्यांच्याजवळ एक अलिशान कार आली. यावेळी कोपरे यांनी कारला हात करुन लातुरला जायचे आहे असे सांगितले तेव्हा कारमध्ये बसलेल्या तीन इसमांनी त्यांना लातुरकडे जात आहोत असे सांगुन कारमध्ये बसविले. गाडी सोलापूरमार्गे लातुरकडे जात असतांना वाटेतच गाडीत असलेल्या तिघांनी फिर्यादीस मारहाण करुन डोक्याला गावठी पिस्टल लावून गाडी दौंडमार्गे अंमळनेर हद्दीमध्ये नेली होती. तिथे त्यांनी कोपरे यांचा पैसे, मोबाईल काढून घेतला. शिवाय कोपरे यांच्या मोबाईलवरुन नेट बँकींगद्वारे कोपरेंकडून एका राष्ट्रीयकृत बँकेचे कस्टमर आयडी.व पासवर्ड घेत बँकेकडून तब्बल आठ लाख 50 हजार रुपयांचे कर्ज मंजूर करुन घेतले. नंतर दोन वेगवेगळया एटीममधून आरोपींनी 95 हजार रुपये काढून घेतले. तितक्यावरही त्यांचे समाधान झाले नाही. बालाजी कोपरे यांना ‘आम्ही तुला जिवे मारु अशी‘ धमकी देतबालाजींचा लातूर येथील मित्र दिपक पांचाळ यास फोनद्वारे मला पैशांची अडचण आहे असे सांगत आणखी 7 लाख रुपयांची मागणी करण्यास सांगितले. तसेच ते गोळा झालेले पैसे चुंबळीफाटा (पाटोदा) येथे घेवून येण्याचे सांगितले.दिपक पांचाळ हे ते पैसे घेवून आल्यानंतर यातील आरोपीतांनी ते पैसे घेतल्यानंतर बालाजी यांना अंमळनेर येथे सोडून दिले. जातानाही पोलीसात तक्रार दिल्यास तुला जिवे मारु अशी धमकी आरोपींनी दिली होती. या प्रकरणी नंतर बालाजी कोपरे यांनी सुरुवातीला पुण्यातील हडपसर ठाण्यात तक्रार नोंदवली.मात्र गुन्ह्याचे घटनास्थळ बीड जिल्ह्यात असल्याने अंमळनेर ठाण्यात गुरनं 86/2024 क.392,384, 504,506,34 भादंवि सह 3/25 भारतीय हत्यार कायदा अन्वये 4 जून रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.

एलसीबीने आरोपींची कसून चौकशी केली
अन् नगर जिल्ह्यातील गुन्हाही झाला उघड!

गुन्हयाचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला मार्गदर्शन करत गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आदेश दिले. या गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना पो.नि.संतोष साबळे यांना हा गुन्हा गोमळवाडा येथील दोघांनी केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.तत्पूर्वी पोलीसांनी एटीएमचे सीसीटिव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपासाआधारे हा गुन्हा या आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले.त्यांनतर गुन्हे शाखेच्या पथकाने गावातूनच दोघांनाही बेड्या ठोकल्या.गुन्हयाच्या अनुषंगाने सखोल विचारपुस केली असता त्यांनी हा गुन्हा अन्य एका साथीदाराच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले. शिवाय बालाजी कोपरे यांच्याकडून मिळालेली रक्कमेपैकी दोघांच्या वाटेला आलेली रुपये 4 लाख रुपयांची रक्कमही पोलीसांनी हस्तगत केली.दोन्ही आरोपींना अंमळनेर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. गुन्ह्याच्या तपासादरम्यान या आरोपींनी अहमदनगर जिल्हयात आणखीन अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून तिथे त्यांनी एक मोबाईल सोन्याची अंगठी व चैन चोरी केली होती.

 

सीसीटिव्ही फुटेज व तांत्रिक तपासाव्दारे उलगडा

आरोंपीनी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने इन्शुरन्स कंपनीच्या मॅनेजरकडून लाखोंची रक्कम लुटली असल्याचे तपासात समोर आले. आव्हानात्मक गुन्ह्याचा बीड एलसीबीने सीसीटिव्ही फुटेज व तांत्रिक तपासाव्दारे उलगडा केला आहे. यातील काकडे नामक आरोपी पुण्यात सुरक्षा रक्षक म्हणून मॉलमध्ये काम करायचा तर दुसरा गावात वाहनचालक म्हणून काम करत असून ते एकमेकांचे नातेवाईकही असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलीसांनी सांगितले.

यांनी केली कामगिरी

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संतोष साबळे, पोउपनि श्रीराम खटावकर, पोह.मनोज वाघ, प्रसाद कदम, पोना.विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, सचिन आंधळे, अश्विनकुमार सुरवसे, चालक/सुनिल राठोड यांनी केली.

सावध रहा, सतर्क रहा

 अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रवाशांनी अनोळखी खासगी वाहतुकीने प्रवास करु नये. तसेच अशा घटना आपल्या आजूबाजूला कुठे दिसून आल्यास तात्काळ टोल फ्री क्र.112 वर पोलीसांना माहिती कळवावी असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे.
 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.