केजमधील आडसकरांच्या मेळाव्याकडे मुंदडांची पाठ

वंचितच्या अशोक हिंगेंना आशिर्वाद देणार्‍या पाटलांचे बजरंग बप्पांकडे दुर्लक्ष

 

बीड । वार्ताहर

 

केजमध्ये रविवारी झालेला भाजप-महायुतीच्या मेळाव्याकडे भाजपच्या विद्यमान आ.नमिता मुंदडा यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी पाठ फिरवली. त्याचे कारण हा मेळावा भाजपचे माजलगाव विधानसभेचे नेते रमेशराव आडसकर यांनी त्यांच्या शारदा इंग्लिश स्कुलमध्ये आयोजित केला होता. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी आ.मुंदडा यांनी त्यांच्या शाळेत पंकजाताईंच्या प्रचारासाठी मेळावा घेतला होता. तिथे आडसकर हजर नव्हते. भाजपातील ही अंतर्गत गटबाजी समोर आलेली असतानाच महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणेंच्या प्रचारात काँग्रेस-सेना पदाधिकारी दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांसाठीही नेत्यांतील अंतर्गत संघर्ष डोकेदुखी ठरत चालला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते अशोक पाटलांनी ‘वंचित’चे उमेदवार अशोक हिंगे यांनाच आशिर्वाद दिला आहे. त्यानंतरही बजरंग सोनवणे यांनी अशोक पाटलांना बेदखल केल्याची चर्चा आहे.

पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी महायुती कामाला लागली आहे. दोन दिवसांपूर्वीच बीडमध्ये महायुतीच्या सर्व घटकपक्षांची बैठक झाली. यामध्ये तीनही पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि गावपातळीवरील पदाधिकारीही उपस्थित होते. पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी आ.अमरसिंह पंडीत यांच्यावर लोकसभेच्या प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आपापल्या विधानसभा मतदार संघात सर्वांनीच पंकजाताईंना जास्तीतजास्त मतदान कसे मिळेल यासाठी प्रयत्न सुरु केले असले तरी तालुक्या-तालुक्यातील नेत्यांमधील मतभेद या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. महाविकास आघाडीतील गटबाजी काही नवी नाही. परंतु महायुतीमध्ये देखील गटबाजी असल्याचे केजच्या मेळाव्यात स्पष्ट झाले. केज तालुक्यामध्ये पंकजा मुंडे यांनी गावोगावी जावून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. त्यांच्यासमवेत अनेक ठिकाणी केवळ रमेश आडसकर असल्याचे दिसून येत आहे. केजच्या आ.नमिता मुंदडा या अंबाजोगाईसह जिल्ह्यात सर्व ठिकाणी पंकजाताईसोबत दिसून येत आहेत. माजलगावमध्ये देखील मोहन जगताप यांनी अद्याप हात झटकले नाहीत.दुसरीकडे प्रकाश सोळंके मात्र कामाला लागले आहेत. एकंदरीतच पंकजाताईसाठी सर्वांनी कंबर कसली असली तरी त्यांच्यातील गटबाजी मात्र थांबलेली नाही.

रजनीताई पाटील आहेत तरी कुठे?

 

काँग्रेसच्या नेत्या खा.रजनीताई पाटील या बीड जिल्ह्यात कुठल्याही कार्यक्रमात सहभागी नसतात. आता लोकसभा निवडणूकीचा प्रचार रंगात आला आहे. महाविकास आघाडीची बैठक ठिकठिकाणी होत आहेत. मात्र काँग्रेसचे कुठलेही पदाधिकारी बजरंगबप्पासमवेत दिसत नाहीत. जिल्ह्यातील काँग्रेस ही अशोक पाटील यांच्या अधिपत्याखाली आहे. त्यामुळे त्यांचे आदेश कुठल्याही पदाधिकार्‍यांना अद्याप प्राप्त न झाल्यामुळे सर्वांनीच शांत बसण्याची भूमिका घेतली आहे. यामध्ये खा.रजनीताई पाटील या आहेत तरी कुठे? असा प्रश्न काँग्रेसचेच कार्यकर्ते विचारीत आहेत. अशोक पाटील यांनीदेखील अद्यापही भूमिका स्पष्ट केलेली नाही.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.