अंतरवाली - 

लोकसभा निवडणुकीत मराठा समाज आरक्षणावरुन आक्रमक होणार आहे. यासाठी गावागावात रणनीती तयार केली जात आहे. मराठा समाजाच्या बैठका होत आहेत. हजारापेक्षा जास्त जणांना उमेदवारी अर्ज दाखल करुन ईव्हीएम प्रक्रिया अडचणीत आणण्याची रणनीती मराठा समाजाच्या बैठकीत घेतली जात आहे. परंतु आता मनोज जरांगे पाटील यांनी वेगळी भूमिका जाहीर केली आहे. रविवारी अंतरवली सराटीत झालेल्या समाजाच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, मोठ्या प्रमाणात फॉर्म भरले तर आपणच अडचणीत येऊ शकतो. माझ्यावर विश्वास ठेवा, मला राजकारणात ओढू नका. आपला प्रश्न लोकसभेचा नाही तर विधानसभेचा आहे. लोकसभा निवडणुकीत मोठया प्रमाणात फॉर्म भरणे किचकट प्रक्रिया आहे. यामुळे एकच उमेदवार द्या. तसेच तुम्हाला गावात बैठक घ्यायची असेल तर त्याची नोंद ठेवा आणि हे 30 मार्चच्या आता निर्णय घ्या, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत जास्त फॉर्म भरून आपला समाज अडचणी देऊ शकतो. आपली उमेदवारी अर्ज सरकार रद्द करू शकतो. जास्त उमेदवारी अर्ज दाखल झाले तर आपले मतं फुटतील. त्यामुळे एक काम करा अपक्ष म्हणून एकच फॉर्म पूर्ण जिल्ह्यातून टाका. कोणता उमेदवार उभा करायचा तो निर्णय तुम्ही घ्या, मी सांगणार नाही. आतापर्यंत अनेक खासदार दिल्लीत गेले आहे, आपल्याला त्याचा काही फायदा होत नाही. आपला आरक्षण दिल्लीत नाहीच, असेही जरांगे म्हणाले आहेत. 

आचारसंहिता संपल्यावर पाहू…

बैठकीत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आता तुम्ही ठरवले आहे, प्रत्येक जिल्ह्यातून फॉर्म भरायचे, हे मी नाही ठरवले नाही. मी तुम्हाला दोन पर्याय सुचवतो. मराठा समाजाला मी सात महिन्यांत पराभूत होऊ दिले नाही. लोकसभेचा विषय समुद्रासारखा आहे. आपला विषय लोकसभेतील नाही तर विधानसभेतील आहे. मराठा आणि कुणबी एक आहेत हा विषय केंद्राचा नाही तर राज्य सरकारचा आहे. मराठा आणि कुणबी असल्याचा आधार मिळाला आहे, आता सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा, ही मागणी आहे. आचारसंहिता संपल्यावर जर सरकारने आदेश काढला नाही तर त्यावेळी बघू.

जिल्ह्यातून एकच अपक्ष मराठा उमेदवार उभा करायचा

तसेच मराठा समाजाने कोणत्याही सभेला जायचं नाही. कोणत्याच पक्षाचा प्रचार करायचा नाही. मात्र मराठा समाजाने शंभर टक्के मतदान करायचे आहे. त्यामुळे तुमचा जर सर्वांचं मत असेल तर एक जिल्ह्यातून अपक्ष मराठा उमेदवार उभा करायचा. यासाठी गावाकडे जा, गावात सर्व मराठ्यांची बैठक घ्यावी लागणार आहे. तुम्ही जो उमेदवार उभे करणार आहे तो सर्वांना मान्य आहे का? याची चर्चा करावी. त्याचा लेखी मला पाठवा आणि आपण उमेदवारांची घोषणा करून टाकणार असल्याचे जरांगे म्हणाले. मात्र, राजकारण माझा मार्ग नसून, मला त्यात अडकवू नका असेही जरांगे म्हणाले आहेत. 

दुसरा पर्याय देखील सांगितला...

तसेच, दुसरा पर्याय असा आहे की, कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या नेत्याकडून लेखी लिहून घ्या की त्याचा सगळे सोयरे कायद्याला पाठिंबा राहील. पण या पर्यायाला मराठा समाजाने विरोध केल्याने जरांगे यांनी हा पर्याय सोडून द्या असे स्पष्ट केले.

राजकारणात मला जायचे नाही...

मराठा समाज मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करणार होते, हा निर्णय अडचणीचा होऊ शकतो असे त्यांना समजावून सांगितले आहे. तुमची राजकीय शक्ती दाखवा असे समाजाला सांगतिले आहे. अनेक उमेदवार देण्यापेक्षा एकच उमेदवार देऊन त्याला निवडून आणा असे सांगितले. फक्त मराठा समाजाचे उमेदवार दिले जाणार नाहीत, तर सर्वच जातीचे उमेदवार दिले जाणार आहेत. मी फक्त त्यांना पर्याय सांगितला आहे. मात्र, राजकारणात मला जायचे नाही, समाजाने सांगितले तरीही मी जाणार नाही असे जरांगे म्हणाले आहेत. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.