जिल्ह्यात 17 मतदान केंद्रे क्रिटिकल;निवडणूक शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ यांची माहिती

 

बीड । सुशील देशमुख

 

बीड लोकसभेसाठी येत्या 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे. निवडणूक काळामध्ये आयोगाच्या आचारसंहितेच्या सर्व नियमांचे पालन सर्वांकडून अपेक्षित आहे.बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी 21 लाख 15 हजार 813 इतके मतदार असून यामध्ये 11 लाख 20 हजार 529 पुरुष व 9 लाख 95 हजार 245 स्त्री मतदार तर 39 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात मतदानासाठी निवडणूक विभागाकडून 2 हजार 355 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये शहरी भागात 441 व ग्रामीण भागात 1914 मतदान केंद्र असणार आहेत. यातील 17 मतदान केंद्र क्रिटिकल आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक ते मनुष्यबळ कर्तव्यावर असून आवश्यक ती वाहने उपलब्ध करुन घेण्यात आली आहेत. निवडणूक शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली.

 

केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार महाराष्ट्रात 5 टप्प्यात  मतदान होणार आहे. बीड लोकसभेसाठी चौथ्या  टप्प्यात म्हणजे 13 मे रोजी मतदान होईल तर मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. या अनुषंगाने निवडणूक विभागाकडून केली गेलेली तयारी याबाबतची विस्तृत माहिती देण्यासाठी आज रविवारी (दि.17) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डीपीसी सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ बोलत होत्या. याप्रसंगी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हाधिकारी कविता जाधव यांच्यासह जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, डायटचे प्राचार्य विक्रम सारुक प्र.जिल्हा माहिती अधिकारी अंजु निमसरकर उपस्थित होत्या.

 

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ म्हणाल्या, 39 बीड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी अधिकार्‍यांवर विविध जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निवडणूकीदरम्यान कोणतेही गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. आवश्यकता असेल त्या सर्व ठिकाणी व्हिडिओ छायाचित्रण, तसेच फोटोग्राफी केली जाईल. त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त तैनात राहिल. या निवडणुकीच्या कोणत्याही टप्प्यावर तक्रार अथवा अडचण निर्माण झाल्यास नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधावा. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक उमेदवारांनी आचारसंहितेचे पालन करावे. प्रचारासाठी राजकीय पक्षांच्या सभांना नियमानुसार परवानगी दिली जाणार असून उमेदवारांना त्यांचा रोड शो दरम्यान त्यांच्या ताफ्यामध्ये केवळ दहा वाहने वापरता येतील. इतर ठिकाणी उमेदवारांना वाहनांतून प्रचार करता येईल; त्याची नोंद उमेदवारांच्या निवडणूक खर्चात घेतली जाईल. निवडणुकीच्या काळात काय करावे किंवा काय करू नये ? याबाबतची विस्तृत माहिती सर्व संबंधितांना प्रशासनाकडून दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. शांततापूर्ण आणि निर्भय वातावरणात लोकसभेच्या निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असल्याचे त्या म्हणाल्या.

 


 

उमेदवारांना 95 लाखापर्यंत असेल खर्च मर्यादा

लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणार्‍या उमेदवारांना प्रचार कालावधीत 95 लाख रुपयापर्यंत खर्च करता येणार आहे. तितक्या खर्चाची मर्यादा निवडणूक विभागाकडून निश्चित केली गेली आहे. तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी 25 हजार इतके शुल्क असेल तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना हेच शुल्क 12 हजार 500 रुपये इतके असणार असल्याची माहिती यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) महेंद्रकुमार कांबळे यांनी दिली.

18 एप्रिल रोजी अधिसूचना निघणार

 

बीड लोकसभा निवडणूकीसाठी येत्या 18 एप्रिल रोजी अधिसूचना निघेल. 25 एप्रिल ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे. 26 एप्रिल रोजीअर्ज यांची छाननी केली जाणार असून 29 एप्रिल रोजी उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असणार आहे, त्यानंतर 13 मे 2024 रोजी बीड लोकसभेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि 4 जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. (लोकप्रश्न)

 

मतदारसंघ निहाय अशी आहेत मतदान केंद्र

बीड जिल्ह्यात विधानसभेचे 6 मतदार संघ आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 2 हजार 355 मतदान केंद्र असणार आहेत. यामध्ये गेवराई मतदार संघात 397, माजलगाव 379, बीड, 382 आष्टी-पाटोदा-शिरूर मतदार संघात 440, केज 415 आणि परळी विधानसभा मतदारसंघात 342 मतदान केंद्रांचा समावेश आहे अशी माहिती उपजिल्हाधिकारी (निवडणूक) महेंद्रकुमार कांबळे यांनी दिली.

 

मतदानासाठी बॅलेट युनिट सीयु व व्हीव्हीपॅट उपलब्ध

 

लोकसभा निवडणुकीसाठी 2 हजार 355 मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाकडून 2 हजार 828 बॅलेट युनिट तसेच तितकेच कंट्रोल युनिट आणि 3 हजार 64 व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करून घेण्यात आले आहेत.प्रत्येक मतदान केंद्रावर 2 बॅलेट युनिटची व्यवस्था केली गेली असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिली.

 

या मतदान केंद्राचे स्थलांतर

बीड येथील नगर रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागातील इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने या ठिकाणचे मतदान केंद्र चंपावती प्राथमिक विद्यालयात स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती यावेळी उपजिल्हाधिकारी कविता जाधव यांनी दिली.

 


 

जिल्ह्यात 39 हजार 294 जेष्ठ मतदार;
85 वर्षांवरील मतदारांना होम व्होेटिंगची सुविधा

निवडणूक आयोगाच्या धोरणानुसार लोकसभा निवडणुकीत ज्या नागरिकांचे वय 85 वर्ष व त्यापेक्षा अधिकचे आहे आणि त्यांना मतदान केंद्रावर येऊन मतदान करणे शक्य नाही अशांना त्यांच्या घरी जाऊन बीएलओमार्फत त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. बीड जिल्ह्यात 85 वर्षावरील मतदारांची संख्या 39 हजार 294 इतकी असून यामध्ये 16 हजार 36 पुरुष व 23 हजार 258 स्त्री मतदारांचा समावेश असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली.

 

जिल्ह्यात 17 मतदान केंद्र क्रिटिकल
पोलीसांकडून जिल्ह्यात 12 ठिकाणी चेकपोस्ट

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने आढावा घेतला आहे. जिल्ह्यात क्रिटिकल मतदान केंद्रांची संख्या 17 इतकी आहे. यामध्ये गेवराई मतदार संघात 03, माजलगाव 02, बीड 02,आष्टी 04, केज मतदार संघात 02 आणि परळी मतदारसंघात 04 मतदान केंद्रांचा समावेश आहे. निवडणूकीच्या कालावधीत गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून सर्व आढावा घेतला जात आहे. अधिकार्‍यांना बैठकांमधून योग्य त्या सूचना केल्या गेल्या आहेत. जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवली जाईल. येत्या दोन दिवसात बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी 12 चेकपोस्ट उभारले जातील. त्याशिवाय पोलीस विविध ठिकाणी गस्तीवर राहतील, अवैध दारु विक्री करणार्‍यांवर तसेच पाहिजे/फरारी शोधून संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी याप्रसंगी दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.