आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणी सरू
बीड । वार्ताहर
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आधी शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शाळांची नोंदणी पूर्ण झाल्या नंतर पालकांना अर्ज करता येणार आहेत अशी माहिती शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिला आहे.
आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्ययावत करावी लागणार आहे. शाळा नोंदणीसाठी येत्या दि.18 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली असून, शाळांची नोंदणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या आरटीई प्रवेशास आवश्यक असणारी कागदपत्र काढून ठेवावी लागणार आहेत.यंदा सरकारी किंवा अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात इंग्रजी माध्यमाची शाळा असेल तर संबंधित शाळेत प्रवेश दिला जाणार नाही, असा बदल राज्य शासनाकडून करण्यात आला आहे. यामुळे केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा नाही तर कायद्यातील बदलामुळे इतरही शाळा आरटीईच्या कार्यकक्षेत आल्या आहेत. त्यामुळे प्रवेश क्षमतेत वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिक्षण विभागाने2024-25 या शैक्षणिक वर्षांची आरटीई प्रवेश प्रक्रिया उशीरा सुरू केली आहे. शाळा नोंदणी व ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष प्रवेश देण्याच्या प्रक्रियेला विलंब होणार आहे.
शाळा नोंदणीसाठी गटशिक्षणाधिकारी यांची बैठक
शाळा नोंदणीसाठी गटशिक्षणअधिकार्यांनी जिल्हा परिषद, अनुदानित, विनाअनुदानित-इंग्रजी शाळांना पत्राद्वारे दिनांक 13 मार्च रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शाळांच्या नोंदणी करिता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यात जिल्हा परिषद, अनुदानित, विनाअनुदानित-इंग्रजी शाळांची दुपारी 2 वाजता बैठक पार पडेल तर तांत्रिक काम पाहण्यासाठी केंद्रप्रमुख, तंत्रस्नेही शिक्षक यांची 4 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
Leave a comment