खराब स्कॉर्पिओ जीप देवून फसवणूक करणार्या आनंद महिंद्रा विरुध्द मुंबईतील आझाद मैदानावर करणार उपोषण
बीड :- राज्य शासनाचा वनश्री पुरस्कार प्राप्त बीड येथील सखाराम शिंदे यांची महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीकडून खराब स्कॉर्पिओ जीप देवून फसवणूक केल्याची घटना 2016 साली घडली. या प्रकरणी वारंवार संबंधित महिंद्रा कंपनीच्या डिलर आणि शोरुमकडे तक्रारी करुन नुकसान भरपाई देण्याची विनंती करुनही त्यांनी शिंदे यांना कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे सखाराम शिंदे यांनी वैतागून संबंधित विमा कंपनी तसेच रोहित कमलनयन सबलोक व आनंद गोपाल महिंद्रा यांच्या विरुध्द फसवणूकीची तक्रार दि.26 फेब्रुवारी 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तसेच या फसवणूक प्रकरणी आनंद महिंद्रा यांच्या विरुध्द मुंबईत आझाद मैदानावर येत्या 11 मार्च 2024 पासून सहकार्यांसह उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
या बाबत वनश्री सखाराम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनात झालेल्या फसवणूकीबाबत विस्ताराने माहिती नमुद केली आहे. सखाराम शिंदे यांनी म्हटले आहे, 31 ऑक्टोबर 2016 रोजी सबलोक कार्स बीड येथून स्कॉर्पिओ जीप (क्र.एम.एच.23-4877) खरेदी केली होती. ही जीप घेतल्यानंतर तीच्या स्पेअर पार्टस्मध्ये खराबी सुरु झाली. ब्रेक वेळेवर न लागणे, जीपच्या चारही चाकातून आवाज येणे, पायंडल जॅम होणे अशा तक्रारी येवू लागल्या. त्यामुळे आम्ही ती जीप शोरुमला नेवून लावली असता तेथील कर्मचारी थातूर-मातूर काम करत त्यामुळे ती जीप नंतर आठ-दहा दिवस चांगली चालत असत परंतु पुन्हा खराब व्हायची. असे असतांनाच दि.15 जून 2017 रोजी मी व माझा मुलगा अक्षय शिंदे बीडहून नेकनूरकडे जीप घेवून जात होतो. आम्ही मांजरसुंबा घाटात पोहोचलो असतांना स्कॉर्पिओ जीपमधून अचानक धूर येवू लागला. त्यामुळे गाडी तात्काळ थांबून खाली उतरलो तितक्यात त्या जीपने अचानक पेट घेतल्याने स्कॉर्पिओ जागीच जळून खाक झाली. या बाबत आम्ही नेकनूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. महत्वाचे म्हणजे गाडीचा पूर्ण विमा उतरविलेला होता. सदरील जीप घेतल्यापासून दोन वर्षाची कंपनीची गॅरंटी व वॉरंटीही होती मात्र असे असतांनाही कंपनी व त्यांच्या डिलरकडून आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले गेले. गाडी पूर्ण जळून खाक झाल्यानंतर सखाराम शिंदे यांनी सबलोक शोरुम व महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीला घटनेची सविस्तर माहिती दिली व नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र जीपचा पूर्ण विमा उतरविलेला असतांनाही संबंधितांनी घटना घडून 7 वर्षे लोटल्यानंतरही कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही.
सदरील स्कॉर्पिओ जीप सखाराम शिंदे यांनी श्रीराम फायनान्स कंपनीकडून कर्जावर घेतलेली आहे, मात्र कंपनीकडून फसवणूक झाल्याने कर्ज फेडता येत नसल्याने अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तरी मला तातडीने योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अन्यथा माझी फसवणूक करणार्या संबंधित विमा कंपनीसह रोहित कमलनयन सबलोक व महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद गोपाल महिंद्रा यांच्या विरुध्द येत्या 11 मार्च 2024 पासून मी माझ्या आठ ते दहा सहकार्यांसह मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाला बसेल असा इशारा वनश्री सखाराम शिंदे यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रति गृहमंत्री, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान पोलिस ठाणे, जिल्हाधिकारी बीड, जिल्हा पोलिस अधिक्षक बीड तसेच आनंद गोपाल महिंद्रा व सबलोक कार्स यांना दिल्या असल्याचे शिंदे यांनी निवेदनात नमुद केले आहे.
Leave a comment