बीड । सुशील देशमुख
बीड विभागातून पहिल्यादांच थेट अयोध्या येथे प्रभु श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी 40 प्रवाशांच्या गटाला घेवून राज्य परिवहन महामंडळाची बस आज दि.23 फेबु्रवारी रोजी रवाना होत आहे. राज्याबाहेर एकाचवेळी दर्शन सेवेसाठी जाणारी ही इतिहासातील बीड विभागातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या यात्रा बसला महत्व प्राप्त झाले आहेत. आज दि.23 रोजी दुपारी 12 वाजता ही पाटोदा आगारातून रवाना होणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी दिली.
गत महिन्यांत अयोध्येत राम मंदीराचे काम पूर्ण होवून गर्भगृहामध्ये प्रभु रामलल्लाची मुर्ती विराजमान झाल्यानंतर देशभरातून दररोज लाखो भाविक अयोध्येला जात आहेत.यासाठी रेल्वेने विशेष गाड्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मात्र बीड येथून थेट लालपरी (बस) पाठविण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 40 प्रवाशांच्या समुहाने बुकींग केल्यानंतर आता आज पाटोदा आगारातून ही एसटी बस अयोध्येला रवाना होत आहे. एकूण 7 दिवसांचा ही दर्शन यात्रा बस असणार असून यासाठी प्रति प्रवाशाकडून 6 हजार 500 रुपये इतके प्रवाशी भाडे आकारले गेले आहे.
पाटोदा ते अयोध्या अशा प्रकारे सर्वांत लांब पल्याची ही पहिलीच बस राहणार असून सात दिवसाच्या प्रवासासाठी बससोबत दोन चालक आणि एक वाहक देण्यात आले आहेत. तसेच प्रवासामध्ये बसला काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास त्यांचेही नियोजन करण्यात आले आहे.ही बस पैठणमार्गे भद्रा मारोती, इंदौर, उज्जेन, ओंकारेश्वर, अयोध्या, वाराणसी, प्रयागराज येथे पोहचून पुन्हा परतीच्या मार्गाने माहूर, औंढा नागनाथ व परळी येथे प्रभू वैजनाथांचे दर्शन घेवून पाटोद्यात पोहचेल. यात्रेदरम्यान निवास व भोजन व्यवस्था प्रवाशी स्वत: करणार आहेत.
Leave a comment