बीड एलसीबीच्या पथकाची कारवाई;आरोपीत विधीसंघर्ष बालकाचा समावेश
माजलगाव । वार्ताहर
तालुक्यातील पवारवाडी येथील जयमहेश साखर साखर कारखान्याच्या पार्कींगमधून दुचाकी चोरुन नेणार्या चोरट्यास बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी मोठ्या शिताफीने पकडले. 16 फेबु्रवारी रोजी तेलगाव येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपी चोरीची दुचाकी विक्री करायला आले होते. तेथेच पोलीसांनी सापळा रचून त्यांना गजाआड केले. यात एका विधीसंघर्ष बालकाचा समावेश आहे.
रोहन पांडुरंग गायकवाड (रा.कल्याण नगर,माजलगाव) याच्यासह अन्य एका विधीसंघर्ष बालकाचा आरोपीत समावेश आहे. लोणगाव (ता.माजलगाव) येथील गणेश यशवंत उजगरे हे जयमहेश कारखान्यात कार्यरत आहेत. ड्युटीला आल्यानंतर त्यांनी त्यांची दुचाकी (एम.एच. 44 एच 9267) जय महेश साखर कारखान्याच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. त्यानंतर ते कारखान्यात इलेक्ट्रिक विभागात कामाला गेले. दुसर्या दिवशी शिफ्ट संपल्यानंतर पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी त्यांना दिसली नाही. नंतर त्यांनी माजलगाव ग्रामीण ठाण्यात फिर्याद नोंदवली. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीसांनी तपास सुरु केला होता.
चोरीची ही दुचाकी विक्री करण्यासाठी चोरटे तेलगाव येथे एका पेट्रोलपंपाजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलीसांना मिळाली. त्याआधारे पोलीसांनी परिसरात सापळा रचला.तिथे दुचाकी घेवून आलेल्या रोहन पांडुरंग गायकवाड व एक विधीसंघर्ष बालकाकडे पोलीसांनी दुचाकीच्या कागदपत्राबाबत विचारणा केली असता कागदपत्र नसल्याचे निष्पन्न झाले. चौकशीअंती दोघांनीही दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यांना पुढील कार्यवाहीसाठी माजलगाव ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, गुन्हे शाखा निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी उपनिरीक्षक राडकर, सहायक फौजदार तुळशीराम जगताप, पोलीस हवालदार पी.टी.चव्हाण, राहुल शिंदे, पोना. हंगे, पोकाँ.राठोड चालक जायभाय यांनी केली आहे.
Leave a comment