मंगलाष्टकाप्रसंगी फुलांसह रेवड्यांची उधळण
बीड । सुशील देशमुख
तालुक्यातील श्रीक्षेत्र नामलगाव येथील आशापुरक गणेशाचा विवाह सोहळा गुरूवारी (दि.15) सुर्योदयावेळी सकाळी 7 वाजता भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी भावीकांनी अक्षदा आणि रेवड्यांची उधळण करत आशापुरक गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले.
पंचमी दिवशी म्हणजेच बुधवारी सायंकाळी आशापूरक मंदिरातून श्री गणेशासह रिध्दी सिध्दीची छबीना व पालखी मिरवणुक काढली गेली.
श्रीक्षेत्र नामलगाव येथे मंगळवारी गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. त्यानंतर गुरूवारी सकाळी 7 वाजता श्री आशापुरक गणेशाचा विवाह सोहळा भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गणेश विवाहाच्या 4 दिवसांपुर्वी म्हणजे माघ शुध्द प्रतिपदा ते पंचमीपर्यंत द्वारयात्रा काढून परंपरेप्रमाणे चारही दिशांना सर्व देवतांना या विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित केले गेले.
पंचमी दिवशी आशापुरक गणेशाला महापुजा व अभिषेक करून वस्त्र दागिने आणि अलंकार चढवले गेले. दरम्यान सायंकाळच्या सुमारास प्रदोषकाळी श्री गणेशाची पंर्चोपचार पुजा करून रविंद्र चिंतामणराव पाठक यांच्या वतीने नैवेद्य दाखवून महाआरती केली गेली. त्यानंतर ग्रामदैवतेला नैवेद्य अर्पण केला गेला. काशीचा राजा नामलगाव येथे स्थित झालेला आहे. परंपरेनुसार या राजालाही विवाह सोहळ्याचे निमंत्रण दिले जाते.
पंचमी दिवशी म्हणजेच बुधवारी सायंकाळी मंदिरातून श्री गणेशासह रिध्दी सिध्दीची छबीना व पालखी मिरवणुक काढली गेली. मंदिराला प्रदक्षणा पुर्ण केल्यानंतर क्षेत्र उपाध्य प्रमोद सर्वेश्वरराव कुलकर्णी यांच्या मंत्रघोषाने श्री गणेशाची आरती संपन्न झाली. हे सर्व पुजा, अर्चना विधी संपन्न झाल्यानंतर गुरूवारी म्हणजेच षष्ठी दिवशी पहाटे श्री गणेश चरित्र कथन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित भाविकांना अक्षदांसह फुले आणि रेवड्यांचे वितरण करत सकाळी 7 वाजता ब्रम्हवंदांच्या साक्षीने श्री आशापुरक गणेशाचा विवाह सोहळा मंगलाष्ठकांचे गायन करून संपन्न झाला.
यावेळी उपस्थित भावीकांनी फुले अक्षदांसह रेवड्यांची उधळन करत आनंद साजरा केला. या विवाह सोहळ्यानंतर श्री गणेशाची मंदिर परिसरात पालखी मिरवणुक काढण्यात आली. या प्रसंगी मंदिराचे पुजारी, माजी आ. सुनिल धांडे, माजी मंत्री बदामराव पंडित, गणेश महाराज पुजारी, नितीन धांडे, नंदकुमार शेळके, ज्ञानोबा शेळके, बाबासाहेब शेळके यांच्यासह नामलगाव व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a comment