ज्ञानराधा, साईराम, राजस्थानी 1 फेब्रुवारीपासून ठेवी वाटप करणार
बीड । वार्ताहर
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार्या प्रा.सचिन उबाळे यांच्या आमरण उपोषणाची दखल प्रशासनाने घेतली असून सोमवारी (दि.15) जिल्हाधिकार्यांसमोर मल्टीस्टेटचे चेअरमन, प्रशासकीय अधिकारी आणि उपाध्यक्ष स्वत: येवून आम्ही सर्व ठेवीदारांच्या ठेवी सहा महिन्यांच्या आत पूर्णपणे देवून टाकू असू लेखी दिले. तसेच उद्याच्या 1 फेब्रुवारी पासून ठेवी वाटप चालू करू असे सांगितल्यानंतर आणि उपोषणस्थळी येवून सर्वांसमोर याची ग्वाही दिल्यानंतरच ठेवीदारांच्या म्हणण्यानुसार प्रा.सचिन उबाळे यांनी आपले उपोषण तात्पुरते मागे घेतले आहे. सर्व बँकेच्या लोकांनी जिल्हाधिकार्यांनाच लिहून दिले आहे आता त्यांना मागे फिरता येणार नाही आणि ते जर आपल्या शब्दापासून मागे हटले तर आपण यापेक्षाही तिव्र आंदोलन संबंधीतांच्या घरासमोर करणार असा इशाराही प्रा.सचिन उबाळे यांनी यावेळी दिला.
बीड जिल्ह्यातील सहकाराची परिस्थिती पूर्णपणे कोसळून गेली आहे. सर्वसामान्य ठेवीदारांचा जीव आता टांगणीला लागला आहे. याची गंभीर दखल घेत बीड जिल्हा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष प्रा.सचिन उबाळे यांनी गेल्या महिन्याभरापासून संंबंधीत बँकांच्या विरोधात आंदोलनाची मालिकाच चालू केली होती. याचाच भाग म्हणून गेल्या 7 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून प्रशासन चांगलेच हारदले आणि स्वत: जिल्हाधिकार्यांनी संबंधीत बँकेच्या चेअरमन यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून घेतले.
सोमवारी दि.15 जानेवारी रोजी साईराम मल्टीस्टेटचे चेअरमन साईनाथ परभणे, राजस्थानी मल्टीस्टेटचे कुलकर्णी व ज्ञाराधाचे यशवंत कुलकर्णी हे स्वत: उपोषणस्थळी हजर झाले. यावेळी तिन्ही मल्टीस्टेटच्या पदाधिकार्यांनी उद्याच्या 1 फेब्रुवारी पासून आम्ही ठेवीदारांचे पैसे वाटप चालू करू. तसेच येणार्या 6 महिन्यांच्या काळामध्ये सर्वांचे पैसे दिले जातील अशी ग्वाही दिली. या बद्दलचे सविस्तर वचनपत्र त्यांनी स्वत:च्या सहीने जिल्हाधिकारी यांच्या नावे दिले आहे. त्याबद्दलची सर्व रेकॉर्डींग उपोषणस्थळावर करण्यात आली आहे. यावेळी बोलताना प्रा.सचिन उबाळे म्हणाले, बीडमधील कुठल्याच बँकेमध्ये माझ्या ठेवी नाहीत. माझ्याकडे कुणाचं कर्जही नाही. परंतू सर्वसामान्य लोकांसाठी आपण हे आंदोलन चालू केलं आहे. येत्या 1 तारखेला सर्वसामान्यांच्या ठेवी द्यायला चालू करायला पाहिजे या शब्दावर मी माझं उपोषण तो पर्यंत मागं घेतलं आहे. त्यांनी जर जिल्हाधिकार्यांना दिलेला शब्द पाळला नाही तर भविष्यातील माझं आंदोलन हे संबंधीतांच्या घरासमोर असेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ठेवीदार उपस्थित होते.
आ.नितेश राणेंचा फोन
उपोषण सोडण्याच्या वेळीच आ.नितेश राणे यांचा फोन प्रा.सचिन उबाळे आला. यावेळी प्रशासनाच्या संबंधीत अधिकार्यांना स्वत: बोलले. या प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई आणि दखल घ्या नसता तुम्हाला याचा गंभीर परिणाम भोगावा लागेल अशी तंबीही दिली. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पण आपण बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य ठेवीदारांचा विषय बोलला असल्याचेही आ.राणे यावेळी म्हणाले.
Leave a comment