सीईओ पाठक यांनी गुत्तेदार,अधिकार्यांना सुनावले
पाणंद रस्त्याच्या कामांना दिल्या भेटी
बीड | वार्ताहर
रोजगार हमी योजनेअंतर्गत जलसिंचन विहिरी, कामावर असलेल्या मजुरांचे फोटो अपलोड केले जातात का? मजुरांची मजुरी, आधार लिंक असलेल्या खात्यानुसार होतेय का? पाणंद रस्त्याचे कामे आणि जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेची गावाअंतर्गत असलेल्या समस्या आणि त्यांचे निराकरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी केले. शासनाच्या योजनांची कामे दर्जेदारच झाली पाहिजेत बोगसगिरी सहन केली जाणार नाही चुकीला पाठीशी घातले जाणार नाही अशा शब्दात त्यांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
सीईओ अविनाश पाठक यांनी 28 डिसेंबर रोजी गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव, रेवकी, तलवाडा, केकत पांगरी, जातेगाव आदी ठिकाणी चालू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांना तसेच रोजगार हमी योजनेमार्फत पाणंदच्या रस्त्याच्या कामांना भेटी दिल्या. काही ठिकाणी अधिकार्यांना सूचना केल्या तर काही ठिकाणी गुत्तेदारांना चांगले काम करण्याच्या सूचना देत बोगस कामे खपवून घेणार नाही असा इशारा दिला.
त्यांच्यासमवेत गेवराई पंचायत समितीचे अधिकारी, रोजगार हमी योजनेचे जिल्हास्तरीय अधिकारी, जलजीवन मिशनचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांची उपस्थिती होती.
यावेळी सीईओ पाठक यांनी पंतप्रधान निवास योजना, मोदी आवास योजना, ओबीसी घरकुल योजना, रमाई घरकुल योजना या सर्व घरकुल योजनांची चालूस्थितीत असलेली कामे पंचायत समितीने उद्दीष्टानुसार पाठविलेले प्रस्ताव आणि मार्च 2023-24 पर्यंत ही सर्व घरकुले बांधून पुर्ण झाले पाहिजेत याबाबतचा आढावा घेतला. जलजीवन मिशन योजनेअंतर्गतच्या कामांना आणि गावकर्यांना पिण्यासाठी या योजनेतून पाणी मिळायला पाहिजे, गुत्तेदारांनी हे काम करताना बोगस कामे न करता अंदाजपत्रकाप्रमाणे काम केले पाहिजे, अशी ताकीद जलजीवन मिशनच्या अधिकारी आणि गुत्तेदारांना दिली. सीईओंच्या या अचानक दौर्यामुळे गुत्तेदार आणि शासकीय यंत्रणा सजग झाल्याचे दिसून आले.
Leave a comment