बीडच्या सभेत मनोज जरांगेंचा इशारा

मुंबईत 20 जानेवारीपासून करणार आमरण उपोषण

बीड । वार्ताहर
मराठा समाज अन्याय सहन करणार नाही. महाराष्ट्रातील मराठ्यांना आता पुन्हा एकदा आंदोलन करावे लागत आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही.आम्हाला मुद्दाम कुठे जाण्या-येण्याची इच्छा नाही, पण आम्ही सहन तरी किती दिवस करायचे? पहिल्यांदा दोन वेळेस सरकारने आमचा वेळ घेतला, पण आम्हाला सुध्दा मर्यादा आहेत. माझ्या पाठीशी मराठा समाजाच्या शक्तीची जोड आहे, म्हणूनच हे आंदोलन आजपर्यंत यशस्वी झाले. त्यामुळे न फसता शांततेत दिशा ठरवू.सरकारने आता डाव टाकला. नोटीस दिल्या, अन् मुंबईत जमावबंदी लावली, पण मी आता येत्या 20 जानेवारीला मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार. माझ्या आंदोलनाचा तुम्ही भेटायला या. सरकार, भेटायला यायला अडवू शकत नाही. मराठे काय असतात ते येत्या 20 तारखेला बघा मात्र आपल्या आंदोलनाला कुठलेही गालबोट लागू द्यायचे नाही. आम्ही आमच्या हक्काच आरक्षण मागतोय. आमच्या मागण्या पुर्ण करा, आम्ही शांतता ठेवणारे आहोत, पण आम्हाला डिवचू नका नाहीतर खूप जड जाईल असा इशारा मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये सरकारला दिला.
बीडमध्ये शनिवारी (दि.23) आयोजित निर्णायक इशारा सभेतून ते बोलत होते. बीड बाह्यवळण रस्त्यावरील धुळे-सोलापूर महामार्गावरील पाटील मैदानाच्या विस्तीर्ण मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची विराट सभा पार पडली. पहाव तिथ मराठा समाज दिसतोय,मुंगीलाही मध्ये शिरता येणार नाही इतकीही जागा शिल्लक नाही. इतक्या व्यापक संख्येने मराठा समाज इथे आलाय असे सांगत मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाज हेच माझे माय-बाप मी मानले आहेत. त्यामुळे माझे समाजाशी माय-लेकरांच नात बनल आहे. हे आंदोलन समाजाशी गद्दारी करण्यासाठी उभारले नाही. महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी मी जीवन अर्पित केले आहे. हे  फक्त बीड जिल्ह्यातील समाजाचे आंदोलन आहे, त्यातील निम्मे घरी आहेत. सगळे आले तर साडेसातशे एकर मैदान लागेल. मी समाजाचे नुकसान होवू देणार नाही.माझ आणि पैशांच कधीच जमत नाही. मराठा आरक्षणाच हसु मला मराठा बांधवांच्या चेहर्‍यावर बघाचयं आहे. माझ्या मराठा समाजाने आरक्षणाची मागणी करुन पिढ्या न पिढ्या गेल्या, अजुन आरक्षण मिळालं नाही. माझ पोरगं अधिकारी होईल या अपेक्षेने अनेकांनी कर्ज काढून, स्वत:च्या अंगावरील सोन मोडून लेकरांना पैसे दिले, पण आरक्षण मिळालं नाही, पण आरक्षण मिळवण्याची हीच संधी आहे. या संधीच सोनं कराव. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार अन् तेच आपण घेणार. आपल्या नोंदी सापडल्या आहेत. सरकारला आरक्षण द्यावेच लागणार. मला काही जण दुश्मन समजत आहेत, पण मी गोरगरिब समाजाचा त्रास मी मांडला तर मी काय चुक केल? असा सवाल जरांगेंनी केला.सरकार आणखी किती दिवस आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवणार? सरकारला वठणीवर आणायची ताकद या मराठ्यात आहे. काही झाले तरी हरकत नाहीत. त्यांना मला शत्रु मानायचे तर मानू द्या. मी त्यांना मोजत नाही. मराठा समाज शांतताप्रिय आहे. आज इतकी मोठी सभा होत असताना बंदोबस्तावरील एकाही पोलीसाला कसलाही त्रास झाला नाही. मराठा समाजातील तरुणांना प्रशासनाने नोटीस देवू नये. सरकार आम्हाला मुंबईत येण्यापासून अडवू शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. आमच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे सरकारने मागे घ्यावेत अशी मागणी त्यांनी केली. सामुहिक राष्टगीताने सभेची सांगता झाली.

मराठा आमदार,मंत्र्यांनो,समाजाच्या पाठीशी रहा

मनोज जरांगे म्हणाले, चंपावतीनगरीतून मी मराठा समाजाचे आमदार, मंत्री यांना हात जोडून विनंती करतो, आता समाजाच्या लेकराच्या पाठीशी उभे रहा. जर तुम्ही पाठीशी उभा राहिला नाहीत, तर मराठ्यांचे घर तुमच्यासाठी कायमचे बंद राहिल, त्यामुळे तुम्ही समाजाच्या मदतीसाठी ताकदीशी उभे रहा.

सरकारला आता शेवटचा इशारा

आरक्षण लवकर द्या, आंतरवलीतून आम्ही गाव सोडलं तर पुन्हा चर्चा सुध्दा बंद करुन टाकू, आम्हाला मुंबईला यायची हौस नाही. मुदतीत आरक्षण द्या. सगळ्यांच आता एकमत झालं आहे, त्यामुळे मुंबईत येवून उपोषण करणार म्हणजे करणार. येत्या काही दिवसात मराठा बांधवांनी शेतातील कामे करुन घ्यावीत. इतर कोणी पक्ष, संघटनाांनी परस्पर बैठक घेवून मनाने निर्णय घ्यायचे नाहीत. सर्वांनी मराठा समाजासोबत चालावे. वेगळे प्रेम दाखवू नका. मराठ्यांच्या सोबत रहा असेही मनोज जरांगेंनी स्पष्ट केले.
 

निष्पाप पोरांना गुंतवण्याचे षडयंत्र सरकारने रचले

मनोज जरांगे पाटील म्हणाले, बीडमध्ये जाळपोळीच्या घटनांत आमच्यावर खोटा डाग लावला.कोणी म्हणतयं घर जाळले, कोणी म्हणतोय हॉटेल जाळले, मात्र निष्पाप पोरांना गुंतवण्याचे षडयंत्र सरकारने रचले. मराठ्यांना काही करायचं असतं तर आज केलं नसतं का? सरकार झोपू नका, मराठ्यांना राज्यात शांतता हवीय, करोडोच्या संख्येने आज मराठा समाज एकत्र आलाय. विनाकारण त्यांना डाग लावू नका. आणि हाच मराठा या राज्याला शांततेचा संदेश देण्यासाठी शांतता रॅली यशस्वी केली. आम्ही कधीच कोणावर टिका करत नाही असेही मनोज जरांगेंनी स्पष्टपणे सांगितले.
 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.