बीड सायबर पोलिसांच्या पथकाची कारवाई
बीड । वार्ताहर
बीड शहरातील शाहूनगर भागातील किराणा दुकानदाराला एक लिंक पाठवून ओटीपी विचारुन त्या आधारे त्याच्या खात्यातून 1 लाख रुपये लंपास करणार्या दोन जणांना सायबर पोलिसांनी थेट गुजरात राज्यातून अटक केली. तर त्यांच्या मदतीसाठी बीडमध्ये आलेल्या अन्य एका साथीदारालाही बुधवारी सायंकाळी गजाआड करण्यात आले. दरम्यान त्यांच्या टोळीत अन्य काही जण असून त्यांचाही पोलिस शोध घेत आहेत.
प्रसाद मधुकर देवळे (रा. शाहूनगर, बीड) हे किराणा दुकानदार आहेत. त्यांनी एक ड्रेस ऑनलाइन मागवला होता व नंतर तो न आवडल्याने रद्द केला होता. दरम्यान, 11 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांना एका मोबाईल क्रमांकावरुन फोन आला व तुम्ही ऑनलाइन ड्रेस मागवला होता त्यासाठी एक लिंक मोबाईलवर पाठवली असल्याचे समोरच्याने सांगितले. लिंक ओपन करुन देवळेंनी सर्व माहिती भरली व आलेला ओटीपीही भरला. त्यानंतर त्यांना 5 रुपये पाठवण्यास सांगितले गेले. ड्रेस रद्द केल्याने हे चार्जेस असतील म्हणून देवळे यांनी 5 रुपये पाठवले. दरम्यान, 14 नोव्हेंबर रोजी ते बँकेत गेले असता त्यांच्या खात्यातून 99 हजार 999 रुपये डेबीट झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सायबर पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. यावरुन गुन्हा नोंदवला गेला होता. पोलिस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड, भारत जायभाये, अकबर शेख, बप्पासाहेब दराडे, रामदास गिरी, विजय घोडके, प्रदीप वायभट, विकी सुरवसे यांनी या प्रकरणी तपास केला. ज्या खात्यावर रक्कम ट्रान्सफर झाली होती. त्यांची माहिती घेऊन बुधवारी जयेश राजेंद्रभाई पवार (19) व निखीलकुमार राकेशभाई गामीत (25, रा. वार्या जि. तापी, गुजरात) या दोघांना अटक केली. दरम्यान, अटक जयेश आणि निखील दोघेही चांगल्या घरची मुले आहेत. दोघांचे वडिल गुजरात सरकारच्या शासकीय सेवेत आहेत. मात्र पैशांसाठी त्यांनी कमीशनवर आपले बँक खात्याचा दुरुपयोग करण्यास मदत केल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे.
दोघांना मदतीसाठी आला अन् अटक झाला!
सायबर पोलिसांनी ऑनलाइन फसवणुकीच्या या प्रकरणात गुजरातमधील वार्या या गावातून जयेश पवार आणि निखिल गामीत या दोघांना पकडण्याची कुणकुण लागताच त्यांचा अन्य एक साथीदार त्यांच्या मदतीसाठी म्हणून त्यांच्या मागोमाग थेट गुजरातच्या सुरतमधून बीडमध्ये पोहोचला दोघांच्या चौकशीतून त्यांचा सहकारी बीडमध्ये आल्याची माहिती मिळाल्यानंतर सायबर पोलिसांचाही संशय बळावला त्यांनी संबंधितास एसपी ऑफिसमध्ये बोलावून घेतले. संबंधिताची या गुन्ह्याच्या अनुषंगाने सर्व तांत्रिक माहिती कलेक्ट केली असता या दोघांचा तिसरा साथीदार पथिक विजय पवार (वय 26 रा. सुरत,राज्य गुजरात) हा सुद्धा या गुन्ह्यात सेकंड हॅन्डलर असल्याचे निष्पन्न झाले. सायबर पोलिसांनी दाखवलेल्या कौशल्यातून या तिसर्या आरोपीलाही बुधवारी सायंकाळी अटक करण्यात आली. दरम्यान आता तिघांनाही आज गुरुवारी बीड न्यायालयासमोर हजर केले जाणार असून या प्रकरणाचा तपास पोह. विजय घोडके हे करत आहेत.
Leave a comment