नागपूर | वार्ताहर
बीड जिल्ह्यात 30 ऑक्टोबर रोजी माजलगाव आणि बीड शहरात विविध ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी केली जाईल, त्यासाठी दोन दिवसात एसआयटी स्थापन करू अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथील अधिवेशनात केली. दरम्यान जाळपोळीच्या घटनेमध्ये जे सहभागी होते त्यांनाच पोलिसांनी तपासाआधारे ताब्यात घेत अटक केलेले आहे; मात्र तरीही कोणी निरपराध यामध्ये अटक झाले असतील तर त्यांना सोडण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊ असेही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केले.
बीडमधील जाळपोळीच्या घटनेप्रकरणी आज 15 डिसेंबर रोजी सभागृहात लक्षवेधीद्वारे चर्चा झाली. यासंबंधी बीडचे आ. संदीप क्षीरसागर, आ. रोहित पवार, आ. जयंत पाटील यांनी लक्षवेधी मांडली यावर उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बीड पोलीस कारवाईत कमी पडले असले तरी उपलब्ध पोलीस बळानुसार आणि त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्यांनी निर्णय घेतले. 30 ऑक्टोबर रोजी बीड व माजलगाव येथे जो हिंसाचार झाला त्याचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. सभागृहाची इच्छा म्हणून या हिंसाचाराच्या तपासासाठी दोन दिवसात एसआयटी स्थापन केली जाईल. हिंसाचार प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल कोणालाही सोडणार नाही, दया दाखविण्याची ही वेळ नाही असेही फडणवीस म्हणाले.
या प्रकरणात आतापर्यंत 278 आरोपी अटक झाले असून आणखी 101 आरोपी फरार आहेत त्यांनाही पकडले जाईल. आपण कोणालाही सोडणार नाही. ज्यांना अटक केली आहे त्यांच्या विरोधात सबळ पुरावे आहेत. आणि जर यातूनही एखादा निरपराध अटक झाला असेल तर त्याच्याबद्दल वेगळा विचार केला जाईल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. येत्या 2 दिवसात या तपासाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली जाईल अशी घोषणा देखील फडणवीस यांनी केली.
Leave a comment