गहू,ज्वारीला फायदा, भाजीपाल्याला फटका; सलग चौथ्या दिवशीही पावसाची हजेरी
बीड । सुशील देशमुख
बीड जिल्ह्यात चार दिवसांपासून अवकाळी पावसाने शेतकरी हतबल झाले आहेत. या पावसामुळे रब्बीतील ज्वारी, तूर, ऊसासह भाजीपाला पिकांचे नुकसान केले. शेतातील टोमॅटो, कांदा पीकांचे यात नुकसान झाले. आतापर्यंत वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू तर आठ जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येत आहेत. मात्र, बहुतांशी तालुक्यांतील नुकसान पाहणी बाकी आहे.जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनीही शुक्रवारी तालुक्यातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
बीड तालुक्यात 286.6 हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाल्यासह रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. त्याबरोबरच वडवणी तालुक्यातही 345 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिके आणि भाजीपाला अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाला आहे. अनेक ठिकाणी शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिके पिवळी पडू लागली आहेत. अर्थात कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यात हे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ही प्राथमिक पाहणी माहिती असून अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही आकडेवारी 33 टक्क्यांपेक्षा अधिकचे नुकसान दर्शवणारी ठरू शकते असे प्रशासनातील अधिकार्यांनी सांगितले.
जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा सुरुच आहे. वादळी वार्यासह होत असलेल्या अवकाळी पावसाने रब्बी ज्वारीसह गहू पिकांना आगामी काळात फायदा होणार आहे. मात्र, आता उभी ज्वारी लोळत आहे. तसेच कांदा, तुर, कपाशी व ऊस पिकांचे नुकसान होत आहे. काही पिके लोळत आहेत. सलग चार दिवसांपासून पाऊस सुरु असून गुरुवारी (दि. 30) मध्यरात्री अंबाजोगाई व परळी तालुके वगळता सर्वच तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
जिल्ह्यात 13.5 मिलीमिटर पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत जिल्ह्यात या हंगामात 77.4 टक्के (519 मिलीमीटर) येवढा पाऊस झाला आहे.मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात सर्व दूर अवकाळी पाऊस पडला आहे या पावसामुळे भाजीपाला आणि इतर पिकांचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील 143 प्रकल्पांमध्ये पाणीसाठा फारसा वाढलेला नाही. आता प्रकल्पांमध्ये केवळ 18.6 टक्के येवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.
Leave a comment