बळीराम गवतेंनी मानले ना.मुंडे यांचे आभार
बीड । वार्ताहर
जिल्ह्यातील 3 तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे बीड विधानसभा मतदारसंघाचे नेते बळीराम गवते यांनी बीड मतदारसंघासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. गवते यांनी मांडलेले शेतकर्यांचे गार्हाणे पाहून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील 52 महसूल मंडळांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केला आहे. त्यामुळे त्यांचे शेतकर्यांच्या वतीने जाहीर आभार मानले आहेत.
बीड जिल्ह्यात जून पासून पावसाळ्याच्या अखेरपर्यंत पावसाचे पडलेले प्रमाण तसेच कोरड्या दुष्काळाचे मापदंड त्याचबरोबर पाणीसाठे या सर्वांचा विचार करून बीड जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 52 महसुली मंडळांचा आज नव्याने दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करण्यात आला आहे.बीड जिल्ह्यातील धारूर, वडवणी व अंबाजोगाई या तीन तालुक्यांचा महसूल विभागाने दि.31 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाद्वारे याआधीच दुष्काळग्रस्त तालुक्यांचा यादीत समावेश केलेला आहे. त्यानंतर आता बीड जिल्ह्यातील उर्वरित परळी, आष्टी, गेवराई, बीड, पाटोदा, शिरूर कासार, केज व माजलगाव या 8 तालुक्यातील 52 महसुली मंडळांचा दुष्काळी यादीत नव्याने समावेश करण्यात येणार असून, याबाबत आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. बीड तालुक्यातील पाली, म्हाळसजवळा, नाळवंडी, राजुरी (न), पिंपळनेर, पेंडगाव, मांजरसुंबा, नेकनूर, लिंबागणेश, चौसाळा, बीड या महसूल मंडळाचा या यादीत समावेश आहे. मतदारसंघात संघातील गावांचा दुष्काळी यादीत समावेश करण्यात यावा, यासाठी बळीराम गवते यांनी निवेदन दिले होते. त्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर ही मागणी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी लावून धरली आणि शेतकर्यांना मोठा आधार दिला आहे. त्याबद्दल शेतकर्यांच्या वतीने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत.
Leave a comment