बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक तथा ‘द कुटे ग्रुप’ चे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांचा अखेर भाजपात प्रवेश झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूर येथे कुटे यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी अर्चना कुटे यांचीही उपस्थिती होती. कुटे यांच्या भाजपा प्रवेशने जिल्ह्यातील समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच कुटे यांच्या तिरूमला ग्रुप मधील काही कंपन्यांची आयकर विभागाने तपासणी केली होती. यानंतर हा प्रवेश झाल्याने याचीही चर्चा होत आहे.
बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले आणि द कुटे ग्रुप 'च्या माध्यमातून देशभर ओळख असलेले सुरेश कुटे यांच्या कुटे उद्योग समूहावर काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने तपासणी मोहीम हाती घेत छापेमारी केली होती. त्यावेळेपासून सुरेश कुटे राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या.
सुरेश कुटे आणि अर्चना कुटे हे दाम्पत्य भाजपात प्रवेश करील, अशा अटकळी अनेक दिवसांपासून बांधल्या जात होत्या. यातच आज कुटे यांनी जाहीरपणे भाजपात प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना प्रवेश दिला.
या प्रवेशाने आता बीड जिल्ह्यातील भाजपमधील अनेक समीकरणे बदलणार आहेत. भाजप कुटे यांच्याकडे लोकसभेचे उमेदवार म्हणून पाहत असल्याचीही सूत्रांची माहिती आहे.
विशेष म्हणजे या प्रवेशावेळी बीड जिल्ह्यातील भाजपचा कोणताही मोठा पदाधिकारी उपस्थित नव्हता, त्यामुळे आता कुटे यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस गट पंकजा मुंडेंच्या बीड जिल्ह्यात वेगळा सवतासुभा निर्माण करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Leave a comment