बीड । वार्ताहर
बनावट दारू तयार करण्यासाठी आणलेला स्पिरीटचा साठा व इतर साहित्य असा एकूण 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तालुक्यातील चिंचोली माळी परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली.
तालुक्यातील चिंचोली माळी परिसरात बनावट दारू तयार करण्यासाठी स्पिरीट व इतर साहित्य आणल्याची गुप्त माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्यानंतर बीड येथील अधिक्षक विश्वजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक अभय औटे व इतर अधिकारी, कर्मचार्यांच्या पथकाने चिंचोली माळी परिसरात धाड टाकली, याठिकाणी आनंद श्रीकृष्ण उकंडे याने स्पिरीटचा साठा करून ठेवला होता, पथकाने स्पिरीट, दुचाकी, आरोपींचे मोबाइल जप्त केले. या कारवाईत एकूण 2 लाख 313 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आनंद श्रीकृष्ण उकंडे (रा.पूनम गल्ली, बीड) व आकाश श्याम जाधव (रा.सुभाष कॉलनी,रा.बीड) यांना अटक करण्यात आली. प्रभारी निरीक्षक अभय औटे, निरीक्षक रमेश राठोड, विजय आगळे, आर.एन.गोणारे, बी.के.पाटील, एस.व्ही.धस, एस.एस.सांगोळे, एन.बी.मोरे, सुशील ढोले आदींनी ही कारवाई केली.
आरोपींना 14 दिवसांची कोठडी
31 ऑक्टोबर रोजी दुपारी कारवाई केल्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अवैधरित्या मद्य तयार करणारे तसेच विक्री करणार्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर आहे. बीड जिल्ह्यात गोवा मद्य आणि बनावट मद्य, हातभट्टी विक्री, बनावट ताडी विक्री करणारांची आता खैर नाही, असे करणे म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभाग यांचेशी गाठ आहे अशी माहिती अधिक्षक विश्वजित देशमुख यांनी दिली आहे.
Leave a comment