बीड | वार्ताहर
औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी आज रविवारी दुपारी बीडमध्ये दाखल होत जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासोबत जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबतचा आढावा घेत योग्य त्या सूचना केल्या. मराठा आरक्षण आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिंसक वळण मिळाले असून या घटना सर्वांसाठीच दुर्दैवी आहेत. पोलीस या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असून शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे असे आवाहन आयजी चव्हाण यांनी केले.
मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण राज्यभरात गाजत असतानाच बीडमध्ये आरक्षणाचे आंदोलन चिघळले आहे. शनिवारी रात्री बीड तालुक्यातील पाली नजीकच्या आहेर वडगाव येथे बीड आगाराच्या बीड-कोल्हापूर ही संपूर्ण बस पेटवून दिली. तसेच बीड बाह्यवळण रस्त्यावरील महालक्ष्मी चौकात शनिवारी रात्री मराठा समाज बांधवांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले. असे असतानाच रविवारी सकाळी चराटा फाट्याजवळ अज्ञातांकडून एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे शहर आणि जिल्हयात परिस्थिती नाजूक बनत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने आज सकाळपासून बीड आगारातील सर्व बसच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची मात्र तारांबळ उडाली. अनेकांनी खाजगी प्रवासी वाहनांचा आधार घेत आपले गाव गाठले.
एकंदरच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून वातावरण तापले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथे एका तरुणाने पाण्याच्या टाकीवर चढून आरक्षणाची मागणी करत शुक्रवारी रात्री उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह अंबाजोगाईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणून ठेवत आंदोलन केले होते. त्यानंतर तहसील आणि उपजिल्हाधिकारी प्रशासनाने नातेवाईकांची समजूत काढत मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी ताब्यात घेण्यात आला होता.
एकंदरच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेले आंदोलन चिघळत असताना बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्याच्या अनुषंगाने आयजी ज्ञानेश्वर चव्हाण यांनी रविवारी दुपारी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल होत आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडून जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला त्याबरोबरच जिल्ह्यात होत असलेले साखळी उपोषणे व इतर माहिती जाणून घेतली. आंदोलनाला लागलेले हिंसक वळणे हे दुर्दैवी आहे. शांततेत आंदोलने करावीत अशी प्रतिक्रिया आयजी ज्ञानेश्वर चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांची उपस्थिती होती.
Leave a comment