पुरुषांच्या तुलनेत स्त्री मतदारांचे दर हजारी प्रमाण 887 

 

मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी नावनोंदणी करावी

बीड । सुशील देशमुख

बीड जिल्ह्यात 5 जानेवारी 2023 च्या अंतिम मतदार नुसार 11 लाख 15 हजार 607 पुरुष मतदार व 9 लाख 90 हजार 197 स्त्री आणि तृतीयपंथी 3 असे एकूण 21 लाख 5 हजार 838 मतदार होते, आज दि.27 ऑक्टोबर रोजी प्रकाशीत होणार्‍या 1 जानेवारी 2024 च्या प्रारुप मतदार यादीमध्ये 11 लाख 22 हजार 078  पुरुष तर 9 लाख 95 हजार 496 स्त्री मतदार आणि 40 तृतीयपंथी असे एकूण 21 लाख 17 हजार 614 एवढी मतदार संख्या आहे. मतदारांच्या संख्येत 6471 पुरुष मतदारांची वाढ झाली. तर 5299 एवढ्या स्त्री मतदार यांची वाढ झाली आहे. बीड जिल्ह्यात पुरुषांच्या तुलनेत स्त्री मतदारांचे दर हजारी प्रमाण 887 आहे. बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी जि.प.चे सीईओ अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आदींची उपस्थिती होती.


पुढीलवर्षी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्त्वाची संधी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करावी. असे आवाहन त्यांनी केले. मतदारांनी प्रारूप यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याची मतदारांनी खात्री करणे आवश्यक आहे. बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते.तसेच आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. तपशील सुद्धा अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांना सदर तपशिलांमध्ये दुरुस्त्या करायच्या असतील त्यांनी अर्ज क्र. आठ भरावा. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन अर्हता दिनांकावर आगाऊ मतदार नोंदणी करता येते असेही जिल्हाधिकारी मुधोळ म्हणाल्या.

भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातो. या अनुषंगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचे कामकाज सध्या सुरु आहे. याची प्रारुप मतदार यादी आज दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रकाशित होत आहे. आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आयोगाच्या मतदार यादीच्या कार्यक्रमानुसार 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत राबवला जाणार आहे व 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. 1 जानेवारी 2024 रोजी किंवा त्या आधी 18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरीकांना या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच 2024 च्या एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या महिन्यांच्या 1 तारखेला 18 वर्षे पूर्ण करणार्‍या तरुण-तरुणींना ही सदर कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येईल; मात्र त्या अर्जांवरील प्रक्रिया सदर तीन महिन्यात पुर्ण केली जाणार आहे.

नावनोंदणी,दुरस्तीसाठी अशी आहे प्रक्रिया

मतदारांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी फॉर्म क्र. 6 भरावा, मतदार नोंद वगळणी साठी फॉर्म क्र. 7 भरावा. व मतदार नोंदीतील दुरुस्तीसाठी फॉर्म क्र. 8 भरावा.हे सर्व प्रकारचे फॉर्म भरण्यासाठी मतदारांना ऑनलाईन व ऑफलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.voters.eci.gov.in या संकेत स्थळावर जाऊन तसेच व्होटर हेल्पलाईन हे अ‍ॅप मोबाईल वर डाऊनलोड करुन कोणताही मतदार त्याची नाव नोंदणी, दुरुस्ती व वगळणी करु शकतो. तसेच ही बाब ज्यांना शक्य नाही त्यांनी त्यांचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने बीएलओ यांचेकडे सादर करावेत.

18 व 19 नोव्हेंबर आणि 3 डिसेंबरला विशेष शिबीर

18 वर्ष किंवा त्यांवरील नव मतदार, स्त्रिया, दिव्यांग व्यक्ती यांचा सहभाग वाढविण्यासाठी दिनांक 18 व 19 नोव्हेंबर या कालावधीमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांचे सहकार्य घेतले जाणार आहे. तसेच महिलां मतदारांच्या नोंदणीसाठी आणि दिव्यांग, तृतीयपंथी, शरीर व्यवसाय करणार्‍या महिला, भटक्या विमुक्त जमाती यांच्यासाठी 2 व 3 डिसेंबर, 2023 रोजी विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे यासाठी समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ (माविम), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोत्ती अभियान या शासकीय विभागांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

नववधूंचीही होणार नाव नोंदणी

ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने 1 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत राज्यभर विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या काळात राज्यभरातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्यांतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाईल.  

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.