नेकनूर पोलीसांची मादळमोहीत मोठी कारवाई
बीड । वार्ताहर
स्वत:चे खोटे नाव सांगत विटभट्टी मालक असल्याचे सांगून एका ठगाने 60 हजार रुपयांची रक्कम घेवून पलायन केले होते. मात्र नेकनूर पोलीसांनी कसोशीने तपास करत या प्रकरणातील आरोपीस गजाआड केले. त्याने अनेक ठिकाणी गुन्हे केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
विठ्ठल रामहरी जाधव (वय 40,रा.लोळदगाव ता.गेवराई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यास 17 ऑक्टोबर रोजी मादळमोही (ता.गेवराई) येथून ताब्यात घेण्यात आले. महत्वाचे हे की, आरोपीने त्याचे नाव खोटे सांगितल्याने पोलिसांना त्याला शोधणे कठीण होते, मात्र पोलीसांनी कसोशीने तपास करत त्यास गजाआड केले.याबाबत परमेश्वर राजाराम काटकर (रा.धावण्याचीवाडी ता. बीड) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार ते हे त्यांच्या बाधकामावर होते. यावेळी एक अनोळखी तेथे आला होता. त्याने तुम्हाला बांधकामासाठी विटा घ्यायच्या आहेत का, असे विचारून त्यांनी स्वतःची ओळख वीटभट्टी मालक असल्याचे सांगीतले. त्याने त्याचे नाव गणेश काळे (रा.अंबाजोगाई) आहे असे खोटे नाव सांगून नऊ हजार विटा देण्याचा व्यवहार ठरवला. त्याच इसमाने सिरसाळा येथील वीट भट्टी मालक श्रीनिवास नामदेव शेरकर यांना त्याला नऊ हजार वीट पाहिजे आहेत, माझ्या बांधकाम वर आणून द्या असा व्यवहार ठरवून घेतला. 9 जून 2013 रोजी सिरसाळा येथून विटा भरलेला ट्रकासह धावण्याचीवाडी येथे फिर्यादी परमेश्वर भास्कर यांच्या बांधकामावर विटा घेऊन सदर ठग आला.
परमेश्वर काटकर यांना वीटभट्टी मालक तो आहे असे भासवले तसेच वीट घेऊन आलेले ट्रक चालक व मजूर यांना बांधकाम मालक तोच आहे असे भासवले. विटा उतरत असताना फिर्यादी परमेश्वर भास्कर यांचे कडून 60 हजार 300 रूपये पैसे घेऊन ढग फरार झाला व त्याचा मोबाईल बंद केला. त्यानंतर सर्व विटा उतरून झाल्यावर खरे बांधकाम मालक परमेश्वर काटकर व वीट मालक श्रीनिवास नामदेव शेरकर यांना खरा प्रकार कळाला की, त्यांची फसवणूक झाली आहे. त्यानंतर या प्रकरणी 30 जून रोजी 2023 रोजी नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता पोलीसांनी आरोपीस अटक केली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हजारे, उपनिरीक्षक अजय पानपाटील, पोह.क्षीरसागर पोह.बळवंत, पोह.खटाने, पोशि. क्षीरसागर, पोशि. ढाकणे, होम.1592 कदम, पोलीस ठाणे गेवराई चे पोलीस अंमलदार पोना / 1874 गूजर, पोह.परझने यांनी केली.
आरोपी निघाला हिस्ट्रीशिटर!
आरोपी विठ्ठल जाधव हा हिस्ट्रीशिटर असल्याचे तपासाअंती समोर आले.त्याच्याविरुध्द यापूर्वी नेकनूरसह बीड शहर, गेवराई, पुणे येथे वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. त्याने अशा प्रकारची फसवणूक सिरसाळा व परळी भागात केली असल्याचे चौकशीतून समोर आल्याने सहाय्यक निरीक्षक विलास हजारे यांनी सांगीतले.
-----
Leave a comment