मनोज जारंगे पाटील यांची आष्टीत गर्जना
आष्टी : रघुनाथ कर्डीले
गेल्या 70 वर्षात मराठा आरक्षणासाठी जे काय झालं नाही ते मुंबईत सर्वपक्षीय बैठकीमध्ये झालंय. शासनाने एक महिना वेळ मागितला आम्ही दहा दिवस जास्त दिले आहेत. आता फक्त आरक्षणा द्या.आता कारण नकोत फक्त आरक्षण द्या अशी गर्जना मनोज जरांगे पाटील यांनी आष्टी येथे केली.
आष्टी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील आयोजित जाहीर सभेमध्ये ते बोलत होते . ते पुढे म्हणाले की ,महाराष्ट्र शासनाने सन 2004 मध्येच मराठा आणि कुणबी एकच आहेत असा शासन आदेश काढलेला आहे. आत्ता संपूर्ण मराठा समाजाला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र शासनाने द्यावे. मी हे माझ्या स्वार्थासाठी बोलत नसून कायदा ज्यांनी केलेला आहे ते बोलत आहेत. संपूर्ण समाजासाठी मी हे आंदोलन करत असून आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन समाप्त होणार नाही असे सांगून जिवंत असेपर्यंत मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही असे भावनिक आवाहन करून ते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या मराठा समाजाच्या चेहऱ्यावर हसू निर्माण होईल असे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत.
आम्ही आरक्षण मागत असताना आंदोलकांवर लाठीमार करून रक्तबंबाळ केले ,आई बहिणींना मारहाण झाली परंतु समाजाने शांतता निर्माण ठेवून त्यांचा शांततामय मार्गाने आंदोलन करून आरक्षण मिळवायचं असल्यामुळे कोणत्याही तरुणाने आत्महत्या करायची नाही. कुठेही जाळपोळ करायची नाही. सरकारला दिलेली मुदत 14 तारखेला एक महिना संपत आहे त्यानंतर दहा दिवस अजून आपण शासनाला दिलेले आहेत. त्यासाठी शासनाला आठवण म्हणून आंतरवली सराटी येथे 14 ऑक्टोबर रोजी संपूर्ण समाजाने यायचं आहे .एकाही मराठा समाजाच्या व्यक्तीने घरी थांबायचं नाही. संपूर्ण समाजाने आपली एकजूट दाखवायची आहे. मुंग्यासारखी रांग लावा शांततेत या शांततेत जा. मराठा समाजासाठीचे आरक्षण आता दृष्टीपथात आलेले आहे या संधीचे सोनं करा.आता आरक्षण निर्णायक टप्प्यात आलेले आहे.आरक्षण सरकार कसं देत नाही ते पाहू असा गर्भित इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मराठवाड्यातील मराठा समाजाचे विदर्भातील मराठा समाजाशी रक्ताचे नाते आहे. ते सर्व कुणबी प्रमाणपत्र धारक आहेत त्यामुळे सर्व मराठा क्षत्रिय यांना सरसकट प्रमाणपत्र मिळण्याची आवश्यकता आहे .आम्ही आजवर मराठा आरक्षणावर भरपूर अभ्यास केलेला आहे .निजाम कालीन कागदपत्रे हे उर्दू आणि इतर तत्सम भाषेमध्ये आहेत आणि 5000 पुरावे सापडलेले आहेत त्यामुळे आता कायदा पारित करण्यासाठी जो पुरावा लागतो ,जो आधार लागतो तो आधार आता सरकारला मिळालेला आहे. त्यामुळे तात्काळ कायदा पारित कराआणि आरक्षण द्या असा निर्वाणीचा इशारा जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणात शेवटी दिला. यावेळी आष्टी तालुक्यातील हजारो मराठा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारी दोन वाजल्यापासून आष्टी शहर हे गर्दीने गजबजले होते. आष्टी तालुक्यातील प्रत्येक गावातून जास्तीत जास्त लोक छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये रस्त्याच्या तीनही बाजूला जरंगे पाटील यांच्या प्रतीक्षेत बसून होते. आष्टी शहरातील रमाई आंबेडकर चौका पासून बस स्थानकापर्यंत सुमारे 50 जेसीबी मशीन वरून मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यासाठी 500 क्विंटल फुलांची व्यवस्था करण्यात आली होती.
मनोज जरांगे पाटील यांच्या या विराट सभेसाठी उपस्थित असलेल्या मराठा समाज बांधवांसाठी आष्टी शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी सीलबंद पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करून समस्त मराठा समाज बांधवांची तहान भागवली आणि आपल्या सामाजिक समरसतेचा परिचय दिला. पाटील यांच्या सभेला तब्बल पाच तास उशीर झाला तरी हजारो लोक सभेसाठी उपस्थित होते कुठल्याही प्रकारच्या गडबड गोंधळ न करता अत्यंत शांततेमध्ये ही विराट सभा पार पडली.
Leave a comment