शिष्टमंडळ जालन्याकडे; थोड्या वेळात मनोज जरांगेचा निर्णय होणार
मुंबई | वार्ताहर
मराठ्यांना सरसकट इतर मागासवर्गाचे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी (जि.जालना) येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी काल शुक्रवारी रात्री झालेल्या बैठकीत कायद्याच्या सर्व बाजू तपासूनच निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले.दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. येत्या एक महिन्यात निर्णय घेणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. आता शिष्टमंडळ जालन्याकडे रवाना झाले आहे. थोड्या वेळात मनोज जरांगेचा निर्णय होणार आहे.
शुक्रवारी रात्री आंदोलकांच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. सुमारे साडेतीन तासांपेक्षा जास्तवेळ चाललेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार भरत गोगावले, माजी आमदार अर्जुन खोतकर तसेच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच मंत्री चंद्रकांत पाटील, उदय सामंत, दादा भुसे आणि विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते.
मराठ्यांना सरसकट आरक्षण दिल्यास काय कायदेशीर अडचणी येऊ शकतात, याबाबत अधिकाऱ्यांनी मते मांडली. यावर कशा पद्धतीने तोडगा काढण्यात येऊ शकतो, याबाबतही चर्चा झाली. मात्र, यासंबंधी नियुक्त समिती पुढील एक महिन्यात अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करेल. त्यानंतरच राज्य सरकार अंतिम निर्णय घेईल, असे यावेळी ठरविण्यात आले.
Leave a comment