आ.संदीप क्षीरसागरांनी मानले जिल्हाधिकारी, कृषी विभागाचे आभार
बीड / प्रतिनिधी
अग्रीम पीक विमा मंजुरीतून वगळलेली बीड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातंर्गत बीड व शिरूर तालुक्यातील महसूल मंडळांचा अग्रीम मंजूरीत नव्याने सामावेश करण्यात आला आहे. शेतकरी बांधवांवर होणार्या अन्यायाबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कार्यवाही केल्याबद्दल आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी व कृषी विभागाचे आभार मानले आहेत.
जिल्ह्यात पावसाच्या अभावाने खरीप हंगामातील शेतीपिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने शासन व विमा कंपनीच्या नियमानुसार जिल्ह्यासाठी २५ टक्के अग्रीम मंजूर करण्यात आला. परंतु बीड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातंर्गत, बीड तालुक्यातील नाळवंडी, म्हाळसजवळा, पाली तसेच शिरूर तालुक्यातील खोकरमोह, खालापुरी, रायमोह यांसह बीड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात येणारी तिंतरवणी सोडता सगळीच महसूल मंडळे वगळली होती. यावर बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. जिल्हाभरात अवर्षणाची परिस्थिती सर्वत्र सारखी असून शेतकर्यांवर होत असणारा अन्याय दूर करावा अशी प्रशासनाकडे मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाकडून याबाबत शुक्रवारी (दि.८) रोजी रात्री उशिरा अधिसूचना काढण्यात आली आहे. यामध्ये वगळलेल्या सर्व महसूल मंडळांना अग्रीम मंजूर केल्याचे सांगितले आहे. प्रशासनाच्या सत्वर कार्यवाहीने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून याचा मनस्वी आनंद असल्याचे आ.क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
Leave a comment