तब्बल तेरा वर्षानंतर धनूभाऊंनी बांधली पंकजाताईंकडून राखी
मुंडे बहिण-भाऊ एकत्र झाले तर पवार बहिण-भाऊ दुरावले
बीड । वार्ताहर
माणसाच्या सुखाच्या स्मृती, आठवणी काळ दरवळून सोडतो आणि तोच काळ दु:खावर हळूच फुंकर घालण्याचेही काम करतो. काळाच्या महिम्यात काय लिहिलेले असते हे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळेच संस्कृतमध्ये कालाय तस्मै नम: असे म्हटले जाते. तशीच प्रचिती काल राज्यात आली. रक्षाबंधनादिवशी बहिण-भावाच्या नात्यातील ओलावा सर्व काही सांगून जातो. भावा-बहिणीचे नाते, जगाच्या पाठीवर सर्वोच्च पुण्यशील मानले गेले आहे. राज्यात तेरा वर्षांपासून दुरावलेले मुंडे बहिण-भाऊ एकत्र आले. तर दुसरीकडे पवार कुटूंबियात लाडक्या असलेल्या खा.सुप्रिया सुळे यांच्याकडून राखी बांधून घेण्यासाठी संपुर्ण पवार कुटूंबियातील त्यांचे बंधू रक्षाबंधनासाठी एकत्र येत होते, मात्र यावेळी राजकीय भूमिका बदलल्याने नातेही बदलले की काय,असेच काहीच चित्र निर्माण झाले.
परळीत मुंडे बंधू-भगिणीमध्ये राजकीय संघर्ष टोकाला गेला होता. मात्र वर्षभरापासून हा संघर्ष कुठे तरी मृदू झाला आणि बहिण-भावाच्या नात्यातील ओलाव्याला पुन्हा पाझर फुटू लागला. काल रक्षाबंधनाच्या दिवशी मुंबईमध्ये पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी धनंजय मुंडे यांनी पंकजा, खा.प्रितम मुंडे आणि यश:श्री मुंडे या तीनही बहिणींकडून राखी बांधून घेतली.विशेष म्हणजे यावेळी श्रीमती प्रज्ञा मुंडे यादेखील उपस्थित होत्या. हा सोहळा पाहून खरा आनंद प्रज्ञा मुंडे यांनाच झाला असेल. तसा तो आनंद मुंडे समर्थकांनाही झाला. दुसरीकडे अजित पवार हे दरवर्षी आपली बहिणी सुप्रिया सुळेंकडून राखी बांधून घेत होती. राखी पौर्णिमेच्या दिवशी अजित पवार आले नाहीत. रोहित पवारांनी या संदर्भात अजित पवार आले नाहीत. उशिरा का होईना ते येतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती.मात्र रात्री उशिरापर्यंत अजित पवार राखी बांधण्यासाठी आलेच नव्हते.यालाच म्हणतात काळाचा महिमा.काळ कोणाला सोडत नाही.
नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली त्यानंतर अजित पवार यांनी भाजप सरकार मध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पद मिळवले मात्र दुसरीकडे शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील व इतर पदाधिकार्यांनी त्यांच्यासोबत जाण्यास नकार देत फारकत घेतली. एकंदरच राजकीय भूमिका बदलल्यानंतर आता त्याचा परिणाम नातेसंबंधावरही होत असल्याचे दिसून आले आहे. हे पवार कुटुंब यांच्या बाबतीत दिसले असले तरी दुसरीकडे बीड जिल्ह्यात मात्र आता मुंडे बंधू-भगिनी एकत्र आले.अजित पवार रक्षाबंधनासाठी न आल्याने सुप्रिया सुळेंनी अभिजित पवार,श्रीनिवास पवार यांना राखी बांधली. रक्षाबंधनादिवशी त्यांचे एकत्र कौटुंबिक फोटो पाहून लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना मानणार्या अनेकांना मुंडे कुटुंबीय असेच यापुढेही एकत्र राहावे अशा भावना व्यक्त झाल्या असून अनेकांनी हे छायाचित्र पाहून समाधानाच्या भावना व्यक्त केल्या. राजकारणात व्हायचे ते होईल मात्र कुटुंब म्हणून सर्वांनी एकत्र राहायला हवे अशा भावनाही सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.
Leave a comment