डॉ.योगेश क्षीरसागरांनी अजितदादांसमोर दाखवली अभ्यासू प्रश्न मांडण्याची चुणूक 
 

बीड । वार्ताहर

बीडमध्ये रविवारी पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत बीड विधानसभेचे युवानेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर केलेले भाषण त्यांच्या अभ्यासूपणाची चुणूक दाखवणारे ठरले. अजितदादांनी आम्हाला राष्ट्रवादी परिवारात सामावून घेतले. स्व.केशरकाकू, माझे वडील डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी ज्या पक्षात हयात घालवली, त्या पक्षात आल्याने कुटुंबातच आल्याची भावना आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आपण अजित पवार, धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलो असे स्पष्ट करतानाच बीड मतदार संघातील विविध प्रलंबित प्रश्न दादांसमोर मांडत लक्ष वेधून घेतले. शिवाय शरद पवारांच्या सभेत इथले भ्रष्ट आणि निष्क्रिय आमदार विकासाबाबत चकार शब्द बोलले नाहीत. धनुभाऊंनी 2019 मध्ये बीडमध्ये दिवा लावला, मात्र या दिव्याचा उजेड कुठेही पडला नाही. त्याचे चटके मात्र आम्हाला आणि जनतेला बसले. विकासाचे बोलणारे आता बुंगाट पळून गेले अशा शब्दात डॉ.योगेश क्षीरसागरांनी बीडच्या आमदारांवर टिका केली.

डॉ.योगेश क्षीरसागरांनी आपल्या भाषणात अभ्यासूपणे बीड मतदार संघातील मुद्दे मांडत  व्यासपीठावरील मान्यवरांना याबाबतचे गांभीर्यही लक्षात आणून दिले. ते म्हणाले,  बीड जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला असून दुष्काळजन्य स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मदत करावी. तसेच 2020 चा प्रलंबित पीकविमा मिळावा. पूर्वी मागेल त्याला शेततळे दिले, आता मागेल त्याला शेतीला कंपाऊंड वॉल द्यावे, जेणेकरून शेती पिकांचे हिंस्त्र प्राण्यांपासून संरक्षण होईल. बीडमध्ये मेडिकल कॉलेज व्हावे. चौसाळा, बीड येथे शासकीय गोदाम उभारावेत. तरुणांसाठी जिमनेशियम मिळावेत. बीड शहरातील पाणी पुरवठ्याच्या योजनेचे काम रखडले आहे. पिण्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. हद्दवाढ भागासह नगरोत्थान योजनेतील रस्त्याची कामे, खासबाग -मोमीनपुरातील पुलावरील बंधारा, शहरातील मुख्य रस्त्याचे बीड बायपासचे स्लीप रोड, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, नगर-परळी रेल्वे मार्ग, बॅरेजेस, बीडची धाकटी पंढरी नारायणगडासाठी भरीव विकासनिधीचा प्रश्न मार्गी लावावा. बीड मतदारसंघातील उर्वरित प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोडवतील,असा विश्वास डॉ.योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. 


ते आता बुंगाट पळून गेले!
योगेशभैय्यांची आ.क्षीरसागरांवर टिका

डॉ. योगेश क्षीरसागर यांनी भाषणादरम्यान बीडचे आ.संदीप क्षीरसागर यांचे नाव न घेता टिका केली. ते म्हणाले, 2019 मध्ये बीडच्या आमदारांनी आ. प्रकाश सोळंके यांच्याकडून पॅड घेतले, अमरसिंह पंडितांकडून हॅन्ड ग्लोज घेतले, अजित पवारांचे हेल्मेट घेतले आणि धनुभाऊंच्या सैराट बॅटने झिंगाट होऊन सिक्स मारला होता, त्यानंतर ते बुंगाट होऊन पळून गेले, आज जनता त्यांना शोधतेय. त्यांच्यामुळे चार वर्षात निर्माण झालेला विकासाचा अनुशेष अजितदादांच्या माध्यमातून आता एक-दीड वर्षात भरून काढायचा आहे. आणि आगामी विधानसभा निवडणुकीत या झिंगाट बॅट्समनला झिरोवर आउट करायचे आहे. त्यासाठी आमचे सहकारी राष्ट्रवादीतील सहकार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील, फक्त आम्हाला ताकद द्या, अशी अपेक्षा डॉ. योगेश क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे व्यक्त केली.

व्यासपीठावर प्रमुख मान्यवरांमध्ये स्थान

बीड येथे पार पडलेेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तरदायित्व सभेच्या व्यासपीठावर प्रमुख मान्यवरांमध्ये बीड विधानसभेचे युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांना स्थान देण्यात आले होते. डॉ.सारिकाताई क्षीरसागर या देखील सभेला उपस्थित होत्या.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.