बीड । वार्ताहर
राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सायंकाळी बीड शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. स्वत: कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह राज्य सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री उपस्थित होते. दरम्यान बीडमध्ये आगमन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष कै.विनायकराव मेटे यांच्या स्मृतीस्थळी जावून अभिवादन केले. त्यानंतर त्यांचा भव्य दुचाकी रॅलीही काढण्यात आली. एकंदर राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
यावेळी अजित पवारांच्या वाहनांचा ताफा बीड शहरातील जालना रोड मार्गे अण्णाभाऊ साठे चौकात पोहचला. या ठिकाणी बीड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेे क्रेनने भव्य पुष्पहार घालत अजित पवारांचे बीड शहरात भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर बीड शहरात राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून अजित पवारांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. सर्वांचा हा स्वागत सत्कार घेत मंत्र्यांचा ताफा सभास्थळी पोहचला. त्यानंतर व्यासपीठावर सर्वच मंत्री महोदय व मान्यवरांचे फेटा बांधून स्वागत सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर मंत्री धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, आदिती तटकरे, यांच्यासह बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार तसेच इतर पदाधिकारी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. राजेश्वर चव्हाण यांनी प्रास्ताविक करत ऊसतोड कामगारांचे प्रश्न मांडत त्यांचे प्रश्न सोडण्यासाठी काम करणे आवश्यक असल्याचे सांगत आज बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे नमुद केले.
सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची, उत्तर नाही उत्तरदायित्वाची सभा, सभा बीडच्या अस्मितेची असे घोषवाक्य घेवून या सभेसंबंधीचा एक टिझर कृषीमंत्री धनंजय यांनी दोन दिवसापुर्वी जारी केला होता. त्यानंतर आज होत असलेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सभेकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. बीडमध्ये छत्रपती संभाजी महाराज क्रीडागंणाच्या विस्तीर्ण मैदानावर आयोजित करण्याता आलेल्या या सभेला प्रचंड गर्दी झाली आहे.
Leave a comment