'अजित पवार आमचेच नेते, निर्णय घेतला म्हणून काय...'
बारामती: राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सहभागी झाला असेल, तर ही फूटच आहे. मग एकनाथ शिंदे यांच्याही बाबत उद्धव ठाकरे ही फूट नाही, असं म्हणू शकतात का?
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या एका वक्तव्यामुळे आणखी भर पडण्याची शक्यता आहे. कालपर्यंत अजित पवार यांच्या गटाविरोधात दंड थोपटून उभ्या राहणाऱ्या शरद पवार यांनी बारामती येथील पत्रकार परिषदेत संभ्रमात टाकणारे वक्तव्य केले.
पक्षातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लगेच त्याला पक्षात फूट पडली असे म्हणू शकत नाही. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मताचे समर्थन केले. तसेच दादा आमचे नेते आहेत. या सुप्रिया सुळे यांच्या विधानाचे देखील पवार यांनी समर्थन केले. शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणतीही फूट नाही दादा आमचेच नेते आहेत असे वक्तव्य केले होते. याबाबत माध्यमांनी पवार यांना छेडले असता सुप्रिया सुळे यांच्या मताचे शरद पवार यांनी समर्थन केले. ते आमचेच आहेत. त्यात काही वाद नाही. फूट पडली याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी येते, जेव्हा पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला देशपातळीवर, अशी स्थिती इकडे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आणि तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. जो त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच फूट म्हणायचं काही कारण नाही तो त्यांचा निर्णय आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की बीड येथील माझ्या सभेनंतर जर कोणी तिथे आपली भूमिका मांडण्यासाठी येत असेल तर त्याचे लोकशाहीमध्ये स्वागत व्हायला हवे. मला आनंद आहे की वेगळी भूमिका घेतलेले लोक त्यांची भूमिका लोकांमध्ये जाऊन मांडत आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले.
वेगवेगळ्या संस्थांनी केलेले निवडणूक सर्वे याबाबत मला काही माहिती नाही. मात्र आम्ही ज्या संस्थांची वा संघटनांशी बोलतो आहोत त्यामधून महाविकास आघाडीला राज्यांमध्ये चांगल्या जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, केंद्रामधून साखर निर्यातीच्या बंदीबाबत काही निर्णय घेतले जाऊ शकतात. त्यामुळे भविष्यात साखरेच्या किमती कोसळण्याची शक्यता आहे, परिणामी याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. असेही यावेळी शरद पवार म्हणाले.
Leave a comment