बीड । वार्ताहर
येथील शिक्षक सहकारी पतसंस्थेचा वरिष्ठ लिपिक राजाभाऊ रामभाऊ शिंदे (52) यास 70 हजारांची लाच घेताना बीड ‘एसीबी’च्या पथकाने रंगेहात पकडले. 24 ऑगस्ट रोजी शहरातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून ही कारवाई झाली.
तक्रारदाराच्या पत्नी व इतर महिलांच्या नावे संत रोहिदास महाराज महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था स्थापन करण्यासाठी व संस्थेच्या नावास मान्यता देवून श्री.छत्रपती राजर्षी शाहू नागरी सहकारी बँक गेवराई येथे खाते उघडण्यासाठी सहायक निबंधक सहकारी संस्था गेवराई येथून परवानगी मिळवून देण्यासाठी वरिष्ठ लिपिक राजाभाऊ रामभाऊ शिंदे याने तक्रारदाराकडे 75 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र नंतर 2 ऑगस्ट 2023 रोजी तडजोडीअंती 70 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले. त्यानंतर 24 ऑगस्ट रोजी हे पैसे द्यायचे ठरले होते, मात्र तक्रारदाराने याबाबत बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यानंतर पथकातील अधिकारी-कर्मचार्यांनी गेवराईत सापळा रचला. तिथे तक्रारदाराकडून 70 हजारांची लाच घेताना शिंदे यास रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक विशाल खांबे, यांच्यासह उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनूस शेख, भरत गारदे, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे यांनी केली. दरम्यान नागरिकांनी त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ अमाचेशी संपर्क साधावा.भ्रष्टाचारासंबंधित काही तक्रार असल्यास टोल फ्री क्र:- 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन एसीबीने केले आहे.
Leave a comment