लडाखमध्ये झालेल्या दुर्घटनेत लष्कराचे 9 जवान मृत्यू पावले आहेत, लष्कराने पुष्टी केली आहे. तसेच या अपघातात 1 जवान जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. मृतांमध्ये 8 सैनिक आणि 1 ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरचा समावेश आहे. एएलएस वाहन लेहहून न्योमाकडे जात असताना ही दुर्घटना घडली आहे. लष्कराच्या ताफ्यात एकून 34 जवान प्रवास करत होते. त्यामध्ये एक रुग्णवाहिका आणि एक यूएसव्ही गाडी देखील होती. शनिवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास हा अपघात झाला. भारत आणि चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच एलएसीला लागून हा भाग असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
लेह ते न्योमा म्हणजे दऱ्याखोऱ्यांचा भाग... एलएसीच्या अत्यंत जवळचा हा भाग असल्याने लष्कराच्या अनेक रेजिमेंट्स या भागात तैनात असतात. मागील काही महिन्यात चीन आणि भारत यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर सैनिकांची संख्या देखील वाढवण्यात आली होती. मात्र, या अपघातानंतर आता शोक व्यक्त केला जात आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील शोक व्यक्त केला.
काय म्हणाले राजनाथ सिंह?
लेहजवळ झालेल्या अपघातात भारतीय सैन्यदलातील जवानांच्या मृत्यूच्या बातमीने मी दुःखी झालोय. या जवानांनी आपल्या भारतमातेची केलेली सेवा आम्ही कधीच विसरणार नाही. या बिकट परिस्थितीत मी शहीद जवानांच्या कुटुंबांबरोबर आहे. जखमी जवानांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. हे जवान लवकरात लवकर बरे होवोत अशी मी प्रार्थना करतो, असं ट्विट राजनाथ सिंह यांनी केलंय.
Leave a comment