बीडच्या सभेत खा.शरद पवारांनी बंडखोरांसह भाजप नेत्यांना सुनावले
बीड । वार्ताहर
लोकांनी निवडून दिलेली सरकारे पाडण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. स्थिर सरकार देण्याची घोषणा करता आणि केंद्रातील सत्तेच्या जोरावर विरोधकांची सरकारं उलथवून टाकता. त्यातून सामान्य जनतेचे जीवन उद्ध्वस्त केली जात आहेत. ज्यांना आपण सत्ता दिली, ते लोक योग्य पद्धतीने वागत नाहीत. ठाण्यातील सरकारी रुग्णालयात 18 लोकांचे जीव गेले. जखमींना आधार देण्याची जबाबदारी रुग्णालयांवर असताना त्याच रुग्णालयांत लोक मृत्युमुखी पडतात. त्याबाबत राज्य सरकार बघ्याचे भूमिका घेते, हे राज्य कसे चालेले आहे आणि कुठे चालेले आहे. हे आपण सर्वजण बघत आहोत. त्यामुळे चुकीच्या लोकांना आवरायची आता वेळ आलीय. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल मी पुन्हा येईल असे सांगितले आहे, मात्र मोदींनी या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला घ्यावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. पंतप्रधानांनी मणिपूरच्या भगिनींचे दुःख जाणून घेतले नाही असेही पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची 17 ऑगस्ट रोजी बीडमध्ये स्वाभिमान सभा झाली. शरद पवार यांनी चौफेर फटकेबाजी करत भारतीय जनता पार्टीसह सत्तेसाठी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या बंडखोरांनाही सुनावले. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ.अनिल देशमुख, आ.जितेंद्र आव्हाड, माजी खा.फौजिया खान, माजी खा.जयसिंग गायकवाड, आ.सुनील भुसारा, माजी मंत्री राजेश टोपे, रायुका प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख माजी आ.उषाताई दराडे, सय्यद सलीम, पृथ्वीराज साठे, राजेंद्र जगताप, डॉ.नरेंद्र काळे, आ.संदीप क्षीरसागर,साहेबराव दरेकर,अॅड.हेमा पिंपळे, सक्षणा सलगर, प्रा.सुशीला मोराळे, बबन गित्ते आदी उपस्थित होते.
खा.शरद पवार म्हणाले ,लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेली सरकार पाडण्याचा उद्योग भाजपकडून केला जातोय. गोव्याचे सरकार पाडले होते. कर्नाटकचे सरकार पाडले उद्धव ठाकरेंचे महाराष्ट्रातील सरकार पाडले.कमलनाथांच्या नेतृत्वाखालील मध्यप्रदेशमधील सरकार यांनी पाडलं होतं. भाजपवाले एकीकडे स्थिर सरकार देण्याची घोषणा करतात आणि लोकांनी निवडून दिलेले सरकार केंद्राची सत्ता वापरून उध्वस्त करतात.म्हणूनच आज ही आव्हाने आपल्या सर्वांच्या समोर आहेत असे सांगत शरद पवार म्हणाले, ज्यांना आपण सत्ता दिली ते सत्ता दिलेले घटक योग्य पद्धतीने वागत नाहीत. कुठे काहीही होतंय. गेल्या आठवड्यात ठाण्यात सरकारी रुग्णालयात 18 लोकांचा जीव गेला त्यानंतरही हे राज्य सरकार बागेची भूमिका घेते यावरूनच हे राज्य कुठे चालले याची कल्पना येते.
पुढे ते म्हणाले, चमत्कारिक लोकांच्या हातात आज सत्ता आहे. कष्टकर्यांबाबत त्यांना आस्था नाही. समाजात फूट पाडण्याची त्यांची भूमिका आहे. आज देशात किती प्रश्न आहेत. महागाई, खताच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. शेतकरी आज अडचणीत आहे. पण, सरकारला चिंता नाही. कायदा व सुव्यवस्थेची चिंता सरकारला नाही. मणिपूर, नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची समस्या आहे. मणिपूरमध्ये समाजात, गावांत भांडणं झाली. अनेकांच्या घरांवर हल्ले केले जात आहेत. स्त्रीयांची धिंड काढली जात आहे. पण, भाजप सरकार कोणतेही पाऊल उचल नाही. देशाच्या पंतप्रधानांनी मणिपूरला जाण्याची आवश्यकता होती. पण, त्यांनी तिकडे ढुंकूनही पाहिले नाही.अधिवेशनात अवघे तीन मिनिटे बोलले. पण पंतप्रधानांनी मणिपूरच्या भगिनींचे दुःख जाणून घेतले नाही, अशी टीकाही शरद पवार यांनी मोदींवर केली. देशाचे पंतप्रधान स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात म्हणाले, मी पुन्हा येईल माझी त्यांना एक विनंती आहे. महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस तेही मी पुन्हा येईन असं सारखं म्हणत होते. खरंतर पंतप्रधानांनी देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन घ्यावे कारण फडणवीस यांनी सांगितले होते मी पुन्हा येईल ते आले पण मुख्यमंत्री म्हणून नाही तर खालच्या रांगेत त्यामुळे आता प्रधानमंत्री म्हणतात मी पुन्हा येईल देवेंद्रचा सल्ला मार्गदर्शन घेऊन यायचं असेल तर आज आहे त्या पदाच्या खाली कुठे जायचे याचा विचार करूनच तुम्ही पुढचं पाऊल टाका असा सल्लाही त्यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान मोदी यांना दिला. बंडखोरांबद्दल ते म्हणाले, भाजपच्या हाताला धरून तुम्ही सत्तेत आलात आणि भाजपच्या दावणीला जाऊन बसलात पण उद्या लोकांना मतदान केंद्रावर जायची संधी मिळेल. तेव्हा मतदार तुम्हाला तुमची जागा दाखवतील असा इशाराही शरद पवारांनी नाव न घेता बंडखोरांना दिला. या सभेला महिला पुरुष हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. सभामंडप अपुरा पडला इतकी मोठी गर्दी पारस नगरीच्या मैदानावर झाली होती. सूत्रसंचालन विजय पवार यांनी केले.
वय झालं म्हणता,तुम्ही माझं काय बघितलं बीडच्या सभेत पवारांनी अमरसिंह पंडितांना फटकारले
माझं वय झालं म्हणता पण तुम्ही माझं काय बघितलं अशा परखड शब्दात शरद पवारांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या बंडखोरांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले, बीड जिल्ह्यातील नेत्यांना काय झाले माहित नाही एकाने सांगितले एक कोणीतरी आमचा सहकारी पक्ष सोडून गेला आम्ही चौकशी केली काय झालं कालपर्यंत तर ठीक होतं तर त्या नेत्याने सांगितलं की अमरसिंह पंडित यांनी सांगितले की, आता पवार साहेबांचे वय झाले त्यामुळे आपल्याला भवितव्याचा विचार करायचा असेल तर दुसरा नेता निवडला पाहिजे. आता एवढंच सांगा तुम्ही ‘माझं वय झालं म्हणता तर माझं काय बघितलं’ अशा शब्दात खासदार शरद पवार यांनी अमरसिंह पंडितांना फटकारले.
तुरुंगात टाकण्याचे प्रकार परळीत अधिक..
शरद पवार म्हणाले, चुकीच्या लोकांना आवरायची आता वेळ आली आहे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. व्यासपीठावर आज काही लोक आहेत. ते आमच्याबरोबर राजकारणात नव्हते. पण, काहीतरी मुद्दे काढून त्यांना तुरुंगात टाकले जाते. विशेषतः परळीत या गोष्टी अधिक होत आहेत. सत्तेचा गैरवापर करत लोकांना तुरुंगात डांबून कोणी वेगळं राजकारण करत असेल त्यांना उलथून टाकण्यासाठी कधीही वेळ लागणार नाही. ते करायला आमचे लोक तयार झाल्याशिवय राहणार नाहीत, असा इशाराही पवारांनी दिला. त्यांचा हा निशाणा नेमका धनंजय मुंडे यांना तर नव्हता ना अशी चर्चा सभास्थळी सुरु होती.
केशरकाकूंच्या काळातील तीच स्थिती काकूंचे नातू संदीप क्षीरसागर यांनी आणली याचा मला आनंद
खा.पवार म्हणाले, तुम्ही लोकांनी केलेले उत्स्फूर्त स्वागत पाहून मला जुन्या काळाची आठवण झाली. ती आठवण म्हणजे निष्ठेच्या बाबतीत बीड कधीही तडजोड करत नाहीत, त्यांच्या पाठीशी जनता उभी राहते, हे संदीप क्षीरसागर यांनी दाखवून दिले.महाराष्ट्रात आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने काम करत होते. त्यावेळी खर्या नेतृत्वापेक्षा काही लोकांनी वेगळी भूमिका मांडायला सुरुवात केली. सामान्य जनता अस्वस्थ होते. त्यावेळी बीडचे नेतृत्व केशरकाकू क्षीरसागर यांच्याकडे होतं. त्यांनी भूमिका घेतली की, नेत्याच्या निष्ठेच्या संदर्भात मी तडजोड करणार नाही. त्याला पडेल ते करावं लागलं, पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल. पण मी भूमिकेपासून मागे हटणार नाही, अशी भूमिका केशरकाकूंनी घेतली होती. तीच स्थिती काकूंचे नातू संदीप क्षीरसागर यांनी आणली याचा मला आनंद आहे.
थोडी माणूसकी जपा अन्यथा लोकच धडा शिकवतील
पवारांनी आपल्या भाषणात चौफेर भाष्य केले. पक्षाच्या बंडखोरा आमदारांना उद्देशून ते म्हणाले, सत्तेच्या बाजूने तुम्हाला जायचे तर जा पण ज्यांच्याकडून आयुष्यामध्ये काही घेतला असेल त्यांच्याबद्दल थोडी माणूसकी ठेवायचा प्रयत्न करा. आणि हे नाही केले तर लोक तुम्हाला योग्य प्रकारचा धडा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत अशा शब्दात शरद पवारांनी बंडखोरांना सुनावले.
पवारांकडून मान-सन्मान;संदीपभैय्या फुलफार्मात!
पवारांनी धनंजय मुंडेंना ’टार्गेट’ करतानाच जिल्ह्यात मुंडेंना पर्यायी नेता म्हणून संदीप क्षीरसागरांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट झाले. बीडच्या माजी खासदार केशरकाकूंच्या राजकीय निष्ठेचा दाखला देत पवारांनी आमदार संदीप क्षीरसागरांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. खुद्द पवारांनी बीडमध्ये येऊन बळ दिल्याने क्षीरसागरांना बारा हत्तीचे बळ चढले असावे हे निश्चित. त्यातून भविष्यात ते मुंडेंना ‘फाइट’ देऊ शकतील असे आडाखे बांधले जात आहेत.आता या सभेनंतर आमदार संदीप क्षीरसागर जिल्ह्याच्या राजकारणात ‘टॉपचा गिअर’ टाकणार असल्याची चर्चा आहे. जितेंद्र आव्हाडांनीही सभेत आगामी निवडणुकीत खांद्याला खांदा लावून मी तुझ्यासोबत लढेन, असा शब्द पवारांसमोरच संदीप क्षीरसागरांना दिला. दरम्यान, बबन गिते, शंकर बांगर यांच्यासह बीड जिल्हा पुन्हा एकदा हलवून टाकू असा इशाराही दिला. पण आता यापुढे क्षीरसागरांसमोर कडवे आव्हान अजित पवार गटाचे नेते आणि एकेकाळचे त्यांचे मित्र धनंजय मुंडेंचेच असणार आहे. त्यामुळे मुंडेंचे आव्हान मोडीत काढणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शरद पवारांकडून संदीप क्षीरसागरांचे कौतूक
आमदार संदीप क्षीरसागर यांचे शरद पवार यांनी आपल्या भाषणात े कौतुक केले.संदीप क्षीरसागर आणि त्यांच्या सहकार्यांनी मोठ्या कष्टातून या सभेचे नियोजन केले. त्याबद्दल त्यांचे आभार असेही यावेळी शरद पवार यांनी सांगितले.
शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवार साहेबांसोबत राहणार-आ.संदीप क्षीरसागर
राजकारणात भूमिका फार महत्त्वाची असते यापूर्वी सुद्धा आम्ही कधीही भूमिका सोडली नाही. शरद पवार साहेबांचा आशीर्वादामुळेच मी आमदार निवडून आलो. मी शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवार साहेब तुमच्या पायाशी राहणार. बीड जिल्ह्यातील जनता स्वाभिमानी आहे येथील जनता पवार साहेबांना साथ देईल असा विश्वास आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला.ते म्हणाले, पक्षाची पुरोगामी विचाराची जी भूमिका आहे, ती घेऊनच लोक आपल्याला स्वीकारत असतात. मला जिल्हाध्यक्षपदी संधी दिली तेव्हा लोकांनी मला खूप मान दिला. मला लोक डोक्यावर का घेतात, एक दिवसात माझी लोकप्रियता का वाढली तर ही पवार साहेबांची जादू आहे.आपल्याला सोडून गेलेल्याना आता जिल्ह्यातील जनता त्यांची जागा दाखवून देतील. काही नेते काय हातवारे करून भाषणे करत होते. साहेबांचा नाद करायचा नाही म्हणायचे, पण आता जे सोडून गेले त्यांना लोक स्वीकारणार नाहीत.
बबन गित्तेंचे प्रचंड शक्तीपदर्शन सुशीला मोराळे,मंजुर शेख राष्ट्रवादीत
याप्रसंगी परळी मधून बबन गित्ते यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच जेष्ठ नेत्या सुशीला मोराळे, शिवराज बांगर, मंजुरभाई शेख यांनीही प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांना प्रवेश देण्यात आला. यावेळी बबन गीते म्हणाले, मी ज्यांना ज्यांना पाठींबा दिला ते आमदार झाले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये.2024 मध्ये महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार असा विश्वास बबन गित्ते व्यक्त केला.बबन गित्ते हे परळीतून वाहनांचा ताफा घेवून आले होते हे विशेष.
कोण काय म्हणाले?
जयंत पाटील: मध्यंतरी काही जण आम्हाला सोडून गेले मात्र अजूनही त्यांना आमच्या साहेबांच्या आशीर्वादाची गरज आहे हे एकूण आम्हाला मनापासून समाधान वाटले. आमच्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. सर्व धर्म समभाव या न्यायाने आमचा पक्ष काम करतोय आज महागाई सतत वाढत आहे मात्र सरकार यावर चर्चा करत नाही शेतकर्यांच्या आत्महत्या वाढत आहेत सरकार यावर काही बोलत नाही इंधन दर वाढ कमी होत नाही महिलांचे अत्याचार किती मोठ्या प्रमाणात वाढले मात्र सरकार केवळ इतर पक्ष फोडण्यात मग्न आहे संख्याबंळ असतानाही पक्ष फोडण्याचे काम भाजपने केले त्यामुळे आता 83 वर्षाच्या या यौध्दाच्या पाठीशी उभा रहा. आ संदीप क्षीरसागरांनी सभा यशस्वी करून दाखवली, स्वतःच्या ताकदीवर सभेचे नियोजन त्यांनी केले मुंबई कार्यालयात एकही फोन केला नाही. राज्याच्या राजकारणाला मोठी परंपरा आहे. शाहू-फुले-आंबेडकारांचे नाव आपण कायम घेतो. त्यांनी प्रेमाचे राजकारण केले, सूडाचे नाही. सत्तेसाठी कायपण ही भूमिका राज्यात दोन वेळा दिसली. विचारांची फारकत घेताना काही लोक दिसले. राष्ट्रवादीतील नवाब मलिक, अनिल देशमुखांनाही तुरुंगवास भोगावा लागला. पुढे कितीही आव्हाने उभी असली तरी ते विचाराच्या बाजूने आहेत.
अनिल देशमुख: बीडमध्ये काही जणांनी होर्डिंग लावलेले दिसून आले मात्र जे लोक साहेबानी घरी बसावं अशा गोष्टी केल्या तेच लोक आता साहेबाना आशीर्वाद मागत आहेत हे त्यांना शोभते का? भाजपचे स्वतःच्या जागेवर जागा येत नाहीत म्हणून त्यांनी शिवसेना फोडली नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडले. मात्र असे आले तरी आजही बीड जिल्ह्यात अनेक लोक साहेबासोबत आहेत. या मागच्या सवव तीन वर्षत फोडफोडीच्या राजकारणाला जनता वैतागून गेली आहे मोठे प्रकल्प महाराष्ट्र राज्यात आले नाहीत इतर राज्यात गेले यामागे सरकारची उदासीन भूमिका कारणीभूत आहे.
आ.रोहित पवार:-, युवा वर्गाने पवार साहेबांच्या पाठीशी उभा रहावे. एक बाजूला सत्ता आहे तर दुसर्या बाजूला विचार आहे. आम्ही विचारासाठी लढत आहोत आणि आम्ही कोणाला घाबरणार नाही आम्ही एकच गोष्ट ऐकली आहे अन् ती म्हणजे महाराष्ट्र राज्याचा सह्याद्री कधीही दिलीपुढे झुकलेला नाही त्यामुळे गावागावात राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार पोहचून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणायची आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड: आजोबा नंतर आता सगळे नातू पवार साहेबांसाठी लढत आहेत, होके दरेकर, ही नातू मंडळी शरद पवार यांच्यासाठी उभा टाकले आहेत. बीड हा संत भगवान बाबा यांचा जिल्हा आहे.तसेच गोपीनाथ मुंडे यांचा जिल्हा आहे. माझ्यावरील खोटी केस गोपीनाथ मुंडे यांनी मागे घ्यायला लावली, त्यामुळे मुंडे साहेबांची आठवण सातत्याने येते. मात्र त्याच मुंडेंचे पुतणे नाद करायचा नाही म्हणत साहेबाना सोडून गेले. मी संदीप क्षीरसागर याना शब्द देतो की, आम्ही सर्वजण बीड जिल्ह्यात तुमच्या सर्वांच्या सोबत राहो. काही जण संदीप तरी जिल्ह्याचा नेता कधी झाला असता, चांगल्या-चांगल्यांना आपण अंगावर घेतले आहेत. घाबरायचे नाही मी आज काही बॅनर पाहिले त्यात पवार साहेबांचे फोटो वापरून आशीर्वाद मागत जिल्ह्याची दिशाभूल करायची आरे पळपुटेपणा करणार्यांनी नाव तरी टाकायचे. यांना काय दिले नाही साहेबांनी. बंडखोरी करणारे हेच सांगत होते की ‘साहेब माझे दैवत’ मग आता का गेले दैवत सोडून? असा सवाल आव्हाडांनी केलेा.
मुंडेंचे घर पवारांनी फोडलेच नव्हते
पवार यांनी मुंडेंचे घर फोडले नव्हते मात्र काही जणांनी साहेबांची घर फोडले म्हणून दिशाभूल करत चुकीचे आरोप केले. उलट पवार साहेबांनी त्यावेळी मुंडे साहेबाना फोन करून ‘घर फुटतय सावरा’ असे सांगीतले होते, पण तरीही राक्षसी म्हत्वाकांक्षा असणारे आमच्या पक्षात आले आणि आता गेले. सत्ता येते-जाते पण विचारधारा बदलायची नसते, बाप बदलायचा नसतो. बीड जिल्हा विचाराने मजबूत आहे. 1986 साली विधानसभेच्या सर्व सहा जागा पवार साहेबांच्या पक्षाला निवडून दिल्या होत्या आता ही सर्व बीड जिल्हावासीय पवार साहेबांच्या पाठीशी उभा राहतील असा विश्वास आ.जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.
सय्यद सलीम: प्रास्ताविक माजी आमदार सय्यद सलिम यांनी केले.आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असेल. जनता पवार साहेबाच्या पाठीशी आहे. आज आम्हाला जे लोक सोडून गेले ते पळपुटेपणा करणारे आहेत त्यांना जायचे होते तर राजीनामे का दिले नाहीत येणार्या काळात सर्व समाजातील लोकांनी शरद पवार यांच्या पाठीशी रहावे असे आवाहन त्यांनी केले.
माजी आ.साहेबराव दरेकर:- ज्या-ज्या वेळी इलेक्शन लागले त्या त्या वेळी सर्वात जास्त ताकद बीड जिल्ह्यातील लोकांनी शरद पवार यांच्या पाठीशी उभी केली. आता बीड जिल्ह्यातील तरुण पिढी पवाराच्या पाठीशी उभा राहील.
Leave a comment