कायद्याचा धाक न उरल्याने मिसरूड न फुटलेल्या पोरांच्या हातातही पिस्टल
शहरात पिस्टल घेवून फिरणार्या तीघांना पकडले
बीड । वार्ताहर
‘आता फक्त गोळ्या घालायचेच बाकी उरले’ इतकी विदारक स्थिती बीडच्या कायदा व सुव्यवस्थेची झाली आहे. बीडमध्ये मिसुरडही न फुटलेले पोरं थेट जीवंत काडतुसे अन् गावठी पिस्टल घेवून सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न करु लागलेत. यांच्याकडे इतकी हिम्मत येते कुठून? अन् या पोरांना पिस्टल आणि काडतुसे पाहिजेत तरी कशाला? ज्या वयात शिकून स्वत:च करिअर घडवायचे त्या वयात हे उनाडक्या करत गोळीबार करण्याच्या उद्देशाने थेट पिस्टल खरेदी करुन ठेवत आहेत. बीडचा बिहार झालाय, असं अनेकदा म्हटल जातं, मात्र वारंवार घडणार्या अशा घटनांमुळे बिहारपेक्षाही वाईटस्थिती आपल्या जिल्ह्याची होत चालली की काय?असा प्रश्न सर्वसामान्यातून या कारवाईनंतर उपस्थित केला जात आहे. अर्थात पोलीसांनी गुप्त बातमीदाराच्या माहितीवरुन गावठी कट्टे आणि जीवंत काडतुसे घेवून फिरणारे तिघे ताब्यात घेतले हे चांगलेच.
मात्र अशा प्रवृत्तीच्या लोकांना पोलीसांचा धाक का राहिला नाही? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कारण ठिकठिकाणी सुरु असलेले अवैध धंदे, पत्त्याचे क्लब, खुलेआम गुटख, वाळू वाहतूक आणि अशा व्यवसायांना मिळणारे राजकीय अन प्रशासकीय पाठबळ लपून राहिलेले नाही. त्यामुळे बाकीचे सारे चालते आपल्याला काय होणार? ही मानसिकता अवघ्या 20-22 वर्षाच्या पोरांमध्ये वाढीस लागत आहे. शहरातील चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेमकं काय चाललय? असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. पोलीस दुर्लक्ष करतात, अन् लोकही आपल्याला ताण नको, म्हणून सहन करत राहतात, त्यातून गुन्हेगारांचे असे नवे जाळे तयार होण्यास मदत होत आहे हे मात्र नक्की. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी बीड शहरात अनाधिकृत पिस्टल घेऊन फिरणार्या तीन जणांना गजाआड केले. आरोपींकडून तीन पिस्टल जप्त करण्यात आल्या.
जिल्हयामध्ये अवैध रित्या अग्नीशस्त्र बाळगणार्यांचा एलसीबीच्या पथकाकडून शोध सुरु होता. असे असतानाच आरोपी सागर प्रकाश मोरे (वय 22, रा.जिजाऊ नगर, जुना धानोरा रोड, बीड) व वैभव संजय वराट (वय 21,रा. स्वराज्यनगर, बीड) हे शहरातील जुना धानोरा रोड भागात सरस्वती विद्यालयासमोर, गावठी पिस्टल घेवून थांबले आहेत अशी माहिती पो.नि.संतोष साबळे यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली. त्यानंतर पथकाने छापा मारुन दोघांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यांच्या अंगझडतीमध्ये दोघाकडे प्रत्येकी एक-एक गावठी पिस्टल व 5 जीवंत काडतुस मिळून आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरिक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोह मनोज वाघ, प्रसाद कदम, देविदास जमदाडे, पोना. विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, पोशि- सचिन आंधळे, नारायण कोरडे, विकी सुरवसे, अशोक कदम यांनी केली. तीनही आरोपींविरुध्द गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चौकशीत निष्पन्न झालेला आरोपी बालेपीरमधून पिस्टलसह उचलला!
ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींची एलसीबीच्या पथकाने कसून चौकशी केली. तसेच गावठी पिस्टल कोठुन व कोणाकडून आणले? अशी विचारणा केली असता गावठी पिस्टल आम्ही सुयोग ऊर्फ छोट्या मच्छिद्र प्रधान (रा.स्वराज्यनगर, बीड ह.मु. जिजामाता चौक, बीड) याच्याकडून घेतले आहेत. त्याने व आम्ही एक गावठी पिस्टल शहानवाज ऊर्फ शहानु अजीज शेख (21, रा.अजमेरनगर, बालेपीर,बीड) यास विक्री केल्याचे सांगितले.तसेच तो बालेपीर पोलीस पेट्रोलपंपासमोर उभा आहे असे सांगितले. त्याबाबत खात्री करुन पोलीसांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन शहानवाज ऊर्फ शहानु अजीज शेख यास ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये एक गावठी पिस्टल व 2 जीवंत काडतुस मिळून आले.
शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात मोक्कार पोरांची गर्दी
शहरातील शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात पोलिस अधिकारी कधी चक्कर मारतात का? सर्वच शाळा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये दुचाकी उडवणार्या मोक्कार पोरांची गर्दी अलीकडे वाढली आहे. मुलींची छेडछाड करण्याचे प्रकारही सातत्याने वाढले आहेत. शहरामध्ये विविध भागात चालणार्या क्लासेसच्या परिसरातही रोडरोमिओ आणि मोक्कार मुले मुलींना त्रास देवून छेडछाड करतात. चांगल्या घरातील मुली जीव मुठीत घेवून चालतात. यामुळे बीड शहरातील वातावरण गेल्या काही वर्षात खराब झाले आहे. याकडे पोलिस अधिकार्यांनी सकारात्मक दृष्टीने पहायला हवे पण अधिकारीच जर आपल्याला काय करायचे? अशा भावनेने कर्तव्य बजावत असतील तर कायद्याचा धाक तरी कसा राहणार? पोलिस यंत्रणा केवळ गुन्हेगार आणि राजकीय नेत्यांच्या पुढे-मागे फिरण्यातच धन्यता मानत आहेत. पोलिस दलातील अधिकार्यांच्या हप्तेखोरीची चर्चाही शहरात राजरोस होते. यावर पोलिस अधिक्षक म्हणून ठाकूर यांची काही जबाबदारी आहे की नाही? असाही प्रश्न विचारला जात आहे.
Leave a comment