डॉ.योगेश क्षीरसागरांना मात्र निर्णयाची घाई
बीड । वार्ताहर
गेल्या काही दिवसांपासून नियुक्त असलेले नगरसेवक डॉ.योगेश क्षीरसागर हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. ते अजित पवारांना भेटून आल्याचेही अनेक वृत्तपत्रांमध्ये छापून आले आहे. ते भेटले की नाही, हे अजित पवार आणि योगेश क्षीरसागरांनाच माहित. मात्र त्यांनी देखील स्वत: खुलासा केला नाही. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांनी आता लवकर निर्णय घ्यावा अशी घाई ही डॉ. योगेश क्षीरसागर करत आहेत. या संदर्भात त्यांनी जयदत्त क्षीरसागरानादेखील आग्रह केला आहे, पण गत विधानसभेवेळी चुकलेला निर्णय महागात पडला. आता पुन्हा तीच चूक होवू नये म्हणून जयदत्त क्षीरसागर ताकही फुंकून पिण्याच्या मानसिकेतत आहेत. तर दुसरीकडे योगेश क्षीरसागरांना मात्र अजित पवारांच्या कळपात जावून बसण्याची घाई झाली आहे. त्यांनी याकरिता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून लाईन लावल्याचेही बोलले जात आहे. गेल्या आठवड्यात बीडला धनंजय मुंडे आले, तेव्हा त्यांची योगेश क्षीरसागर यांनी भेटही घेतली होती. येत्या काही दिवसात त्यांचा प्रवेश सोहळा निश्चित होणार असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.
मूळातच डॉ. क्षीरसागरांना आता आमदारकीचे स्वप्न पडू लागल्याने त्यांना घाई झाली आहे. अजित पवारांकडे जावून त्यांना नेमके काय साध्य करायचे आहे? हे मात्र कोडेच आहे. कारण एकंदरीत राजकीयदृष्ट्या विचार जर केला तर लोकसभा निवडणूकीनंतरच नेमके काय होणार हे स्पष्ट होणार आहे. भाजपा नेतृत्वाला केवळ लोकसभा निवडणूक महत्वाची आहे. त्यामुळे त्यांच्याकडून गोळा-बेरीज करणे सुरु आहे. विधानसभा निवडणूकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी राहते की नाही, हा खरा प्रश्न आहे. त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
अजित पवारांना मतदारसंघ मिळणार कसा?
मूळातच बीडची जागा ही भाजपा-शिवसेना युतीमध्ये शिवसेनेकडे आहे. जून्या युतीचे समीकरण जुळवले तर ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाईल. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बीडची जागा सुटणार कशी? वास्तविक बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर निवडून आले आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हा मतदार संघ मिळणार कसा? हा मूळ प्रश्न आहे.
मोदींचे आशिर्वाद घेणार्या पवारांना मुस्लिम मतदार स्विकारणार का?
राज्यामध्ये जी राजकीय उलथापालथ झाली आहे. त्यामुळे जनताच संभ्रमात आहे. हिंदूत्व बाजूला सोडून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली. विद्यमान परिस्थितीमध्ये मुस्लिम बहुल मतदार हे भाजपाच्या हिंदूत्वाच्या विरोधात आहेत आणि पंतप्रधान नरेंद मोदी यांनी जाहीरपणे हिंदुत्वाची भूमिका घेतल्याने मुस्लिम मतदार त्यांना स्विकारणार नाहीत हे उघड आहे. त्या परिस्थितीत मोदींचे आशिर्वाद घेणार्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुस्लिम मतदार स्विकारणार का? अन् स्विकारणार नसतील तर बीडमध्ये अजित पवारांच्या उमेदवाराला तरी मुस्लिम मतदार कसे स्विकारतील? याचाही विचार करणे आवश्यक आहे.
आ.संदीप क्षीरसागरांच्या मास्टरस्ट्रोकची हवा कायम
बीडच्या बाजार समिती निवडणूकीत आ.संदीप क्षीरसागर यांनी दोन्ही शिवसेना, शिवसंग्राम, काँग्रेस, वंचित आणि इतर सर्वांनाच बरोबर घेवून गेली 30-35 वर्ष बाजार समितीवर सत्ता कायम ठेवणार्या माजी मंत्री क्षीरसागरांना धक्का दिला. संदीप क्षीरसागरांनी दिलेला हा मास्टरस्ट्रोक त्यांच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरला. त्याचा प्रभाव अजुनही कायम आहे. अनेक जण त्यांना सोडून गेले असले तरी मोठ्या पवारांच्या राष्ट्रवादीची व्होट बँक अजुनही संदीपभैय्यांच्या पाठीशी दिसते. त्यामुळे डॉ.योगेश क्षीरसागरांनादेखील या मास्टरस्ट्रोकचा सामना करावा लागणार आहे.
नगरपरिषद ठरणार लिटमस टेस्ट!
लोकसभा आणि विधानसभेपुर्वी जर स्थानिक स्वराज्यच्या निवडणूका झाल्या तर त्यामध्ये बीड नगर परिषदेमध्येच दोन्ही क्षीरसागरांसाठी लिटमस टेस्ट ठरणार आहे. कारण आमदार संदीप क्षीरसागरांकडे शहरामधील कार्यकर्त्यांची जी फळी होती, ती जयदत्त क्षीरसागरांच्या तंबूत जावून बसली आहे. राहिलेले कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी फाटाफुटीत अजित पवारांकडे गेले आहेत. माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर यांच्या काळात असलेले अनेक नगरसेवक त्यांच्या गटापासून दूर गेले आहेत. ते निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेमध्येही नाहीत. त्यामुळे दोन्ही युवा नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. गत निवडणूकीतच एमआयएम सारख्या पक्षाने मताची गोळा बेरीज मोठ्या प्रमाणात केली होती. त्यामुळे नगरपालिका सोपी नाही. जयदत्त क्षीरसागरांच्या भूमिकेवर न.प.चे यश-अपयश अवलंबून असणार आहे हे ही लक्षात घेणे महत्वाचे आहे.
Leave a comment