राजेंद्र आगवान यांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता यशस्वी पत्रकारिता केली माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे प्रतिपादन
जीवन ही कला आहे याची प्रचिती आगवान दादांनी दिली -लक्ष्मीकांत महाराज पारनेरकर यांचे विचार
बीड / प्रतिनिधी
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असे व्यक्तीमत्व आमचे मित्र राजेंद्र दादा आगवान आहेत. त्यांनी सर्व नाते आणि मित्रृत्वाचे संबंध जोपासत असताना 32 वर्ष शिक्षण क्षेत्रात जीवनाची गुढी उभारत अनेकांच्या जीवनाला समृद्ध केले.दादांनी शिक्षणासोबतच लेखणीच्या माध्यमातून कोणाचाही मुलाहिजा न ठेवता पत्रकारिता दादांनी त्या काळात केली. कुठल्याही लाभाची अपेक्षा न ठेवता कसलेही तंत्रज्ञान नसताना दादांनी यशस्वी पत्रकारिता केली आहे असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले. तर जीवन ही कला आहे याची प्रचिती आगवान दादांच्या जीवनातून मिळते असे विचार पुर्णवादी बँकेचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत महाराज पारनेरकर यांनी मांडले.
बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात 2 ऑगस्ट रोजी सायं.दै.रणझुंजारचे संपादक राजेंद्र आगवान यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर पुर्णवाद परिवाराचे लक्ष्मीकांत महाराज पारनेरकर,माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार डी.के.देशमुख, अमृत महोत्सव सत्कार समितीचे स्वागताध्यक्ष प्रा.सतीश पत्की, कार्यवाहक संपादक दिलीप खिस्ती यांच्यासह सत्कारमुर्ती राजेंद्र दादा आगवान, सौ रागिणी आगवान यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले, आताचा काळ गुणवत्तेचा आहे तोच टिकेल जो गुणवत्ता धारक आहे.पैसा काही काळ टिकतो पण गुणवत्ता, विद्या कायम टिकते. रणझुंजारचे संपादक राजेंद्र आगवान दादांची पुढची पिढी सरस्वती पुत्र आहेत. हे खूप प्रेरणादायी आहे. आगवान दादांचे बोलणे मृदू आणि मिश्किल आहे.‘हर फिक्र को मै धुए मै उडाता चला’ असे आगवान दादांचे जगणे आहे. वय झाले म्हणून कशाची फिकीर नाही असे दादांचे जीवन आहे. कटकटी, नात्याच्या गाठी, त्या सोडवणे ही शर्यत प्रत्येकाच्या जीवनात सुरु असते. असे असतानाही आपले व्यवहार सुरळीत सुरू ठेवले हे राजेंद्र आगवान दादांचे खरे यश आहे. दादांचा शंभर वर्षपुर्तीचा सोहळा असाच भव्य साजरा करु आणि तो सोहळा आम्हा सर्वांना पाहता यावा अशा भावना याप्रसंगी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केल्या.
याप्रसंगी पुर्णवादी बँकेचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पारनेरकर महाराज म्हणाले, गुरुकृपा महत्वाची आहे. शिष्याला भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या विचारातून वर्तमानात आणण्याचे काम करतो तो गुरू असतो आणि अशा गुरुंची कृपा प्रत्येकाला जीवनात महत्वाची असते.जीवन ही कला आहे हे वाक्य आज राजेंद्र आगवान दादांच्या शिक्षण,पत्रकारिता, शेती, संस्थाचालक,सामाजिक कार्य या एकंदर जीवन जगण्यातून दिसून येते अशा शब्दात पारनेरकर महाराजांनी आगवान यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच त्यांना जीवेत:शरदम: शतम: अशा शुभेच्छाही दिल्या.पारनेरकर महाराज म्हणाले, राजेंद्र आगवान दादांचा हा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा खूप छान आहे. मांजरसुबा येथे पारनेरकर महाराजांनी पहिली शाळा उभारली तेव्हा आगवान दादांच्या गढीमध्ये उद्घाटन झाले होते अशी आठवण त्यांनी करुन दिली. विष्णू महाराज पारनेरकर यांनी बीडमध्ये एक गुरू मंदिर उभारलेले आहे. समाज उन्नती, राष्ट्र उन्नती बद्दल जेव्हा आपण बोलतो त्याची सुरुवात सर्व सामान्य माणसापासून सुरू होते. व्यक्ती जीवनाइतके मोठं काही नाही,त्यातूनच आपले कुटूंब, समाज आणि ईश्वर काय आहे हे कळतं. व्यक्ती जीवन महत्वाचे आहे हा विचार आज महत्वाचा आहे. जसे ठरवले तसे जीवनात प्रत्येकाला यशस्वी होता आले पाहिजे. नुसतं जगणं महत्वाच नाही तर अजिंक्य होऊन जगणं भारतीय संस्कृतीला आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
ज्येष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे म्हणाले, पूर्वी पत्रकारितेतील प्रत्येक शब्द महत्वाचा मानला जात. राजेंद्र दादा आगवान हे अत्यंत संघर्षातून पुढे आलेले व्यक्तीमत्व आहेत. त्यांनी जबाबदारीने पत्रकारिता केली दादा मनमिळाऊ, त्यांच्या घरातील प्रत्येकाने संघर्ष केला. राजेंद्रदादा कधीच शांत बसणारे व्यक्तिमत्त्व नाहीत नोकरी सेवानिवृत्त झाले की, त्यांनी सायंकाळ दैनिक सुरू केले. सुविधाचा अभाव असताना लोकविजय, मराठवाडा, महाराष्ट्र टाइम्स, या दैनिकातून दादांनी पत्रकारिता यशस्वीपणे पार पाडली.परिस्थितीचे भान ठेवत दादांनी दिशा बदलत जीवनाचा यशस्वी प्रवास केला.
प्रा.सतीश पत्की म्हणाले, राजेंद्र आगवान दादा केवळ पत्रकार नाहीत तर त्यांनी सामाजिक कार्यातही हिरिरीने काम केले आहे. त्यामुळेच दादांचे व्यक्तित्व सर्व घटकांना आपलेसे वाटते. म्हणूनच आम्ही त्यांच्या सर्व सहकार्यांना सोबत घेऊन या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले. राजेंद्र दादा म्हणजे सर्व परिचित व्यक्तिमत्त्व असून तडफदार व्यक्तिमत्त्व आहेत. मागील 50 वर्षाच्या काळात राजेंद्र दादांनी बिनधास्त पत्रकारिता केली. एकदा बातमी केली की, माघार घ्यायची नाही.हा दादांचा स्वभाव. तेव्हा शोध पत्रकारिता महत्वाची ठरायची.ती पत्रकारिता दादांनी केली असे सांगत प्रा.पत्की यांनी आगवान दादांच्या पत्रकारितेतील काही अनुभव उपस्थितांसमोर मांडले. तत्कालीन तरुण राजकीय पदाधिकार्यांना विकासाची प्रेरणा देण्याचे काम दादांनी केले. याबरोबरच त्यांनी शिक्षण क्षेत्रातही काम केले शिक्षण संस्थेची स्थापना केली असे सांगत दादांना पुढील जीवनासाठी आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या. पूर्णवादी बँक संचालक डॉ. सुभाष जोशी म्हणाले, आगवान काकांची एकंदर वाटचाल पाहिली तर निष्क्रिय हा शब्द दादांसाठी नाही. त्यांनी तरुणपणात नोकरी केली. सेवानिवृत्त झाल्यानंतर स्वतःचे एक दैनिक सुरू केले.आजही अनेकांना ते मार्गदर्शन करतात. याबरोबरच पूर्णवादी बँकेचे संचालक म्हणून काम केले शिक्षण संस्था उभारली. मराठवाडा जनता विकास परिषदेचे त्यांनी काम केले आहे.
माजी शिक्षक आ.डी.के. देशमुख म्हणाले,माणसाचा स्वभाव माणसाचे एकूण व्यक्तिमत्त्व सांगत असतो. संपादक राजेंद्र आगवान दादांनी ज्या-ज्या क्षेत्रात काम केले तेथे त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. त्याकाळी आम्हाला बापूसाहेब काळदाते, गोविंदभाई श्रॉफ यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यातून जनप्रश्न सोडवण्याचे काम करता आले. आगवान दादांनी जनता विकास परिषदेत खूप छान काम केले. बीड रेल्वेसाठी सातत्याने लढा उभारला असेही देशमुख म्हणाले. संपादक दिलीप खिस्ती यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमात सामाजिक, राजकीय, शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून राजेंद्र आगवान दादांचा शाल, पुष्पहार व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
अभिष्टचिंतन सोहळ्यात राजेंद्र दादा सद्गतित
गत 50 वर्षांपासून बीड जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक्षक, सांस्कृतिक क्षेत्रासह पत्रकारितेत अविरत काम करताना अनुभवाने समृध्द झालेले सायं.दैनिक रणझुंजारचे संपादक राजेंद्र दादा आगवान त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या अभिष्टचिंतन सत्कार सोहळ्यात सद्गतित झाले, त्यांचा कंठ दाटून आला.आपल्या सर्व सहकार्यांकडून व्यक्त होणार्या भावना आणि आजपर्यंतच्या कार्याचा त्यांनी घेतलेला आढावा ऐकून आगवान दादा भावूक झाले.या सत्कार सोहळ्यात उत्तर देताना अधिक भावना दाटून आल्याने त्यांनी त्यांच्या वतीने संतोष मुळी यांना आपले मनोगत उपस्थितांसमोर वाचून दाखवण्याचे सांगितले. त्यानुसार मुळी यांनी दादांच्या भावना मांडल्या. संतोष मुळी यांनी दादांतर्फे त्यांच्या भावना व्यक्त केल्या.दादांनी जीवनात कसा घडलो याचे अनुभव कथन केले.आजचा हा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. ज्यांचा सहवास लाभला मार्गदर्शन लाभले त्या सर्वांचे आभार मानले.भगवान शिक्षण संस्था आणि सानप मित्र मंडळी तसेच निरगुडी येथील सर्व ग्रामस्थ यांचा मोलाचा वाटा आहे. पत्नी,मुलगा, मुलगा, सून, जावई या सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. जीवन समृद्ध जगत आहे असे सांगत सर्वांचे आभार मानले.
राजेंद्र दादा सर्व पत्रकारांचे ‘कॉमन फॅक्टर’-राधाकृष्ण मुळी
माजी माहिती संचालक राधाकृष्ण मुळी म्हणाले, सर्वांना समजून घेणे हा राजेंद्र आगवान दादांचा मूळ स्वभाव आहे. म्हणूनच प्रत्येक पत्रकाराला आगवान दादा हे आपले ‘कॉमन फॅक्टर’ आहेत असे वाटते.पत्रकारांचा आवाज बुलंद करण्यासाठी आगवान दादांनी त्या काळात काम केले असे सांगत मुळी म्हणाले, आगवान दादांनी सार्वजिनक जीवनात भाग घेतला. तसेच सर्व कुटूंबाला सोबत घेवून त्यांनी आपली वाटचाल सुरु ठेवली. दादांनी ठरवले असते तर त्यांचा मुलगा विनयला नौकरी नाही तर व्यवसाय करायला प्रोत्साहित केले. हे दादाचे मोठपण आहे असे सांगत मुळी यांनी दादांप्रतिच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी सौ. रचना श्रीकांत देशपांडे यांचे भाषण झाले.============================
सर्व छायाचित्रे: कृष्णा शिंदे,बीड
Leave a comment