राजकारणातला सर्वात मोठा ट्विस्ट ! अधिवेशनापूर्वीच मोठी घडामोड
राष्ट्रवादीतील फुटीला 15 दिवसही उलटले नाही तोच महाराष्ट्रातील राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादीचे सर्व मंत्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवाचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पावसाळी अधिवेशनाआधी अजित पवार गटाच्या मंत्र्याची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांना भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिती तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, छगन भुजबळ वाय बी चव्हाण सेंटरला पोहचले आहेत. वाय. बी. चव्हाण सेंटरवर हे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार यांच्यासोबत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे आणि मंत्रीपदाची शपथ घेणारे सर्व मंत्री शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. शरद पवार यांचा आश्रय या मंत्र्यांना मिळणार का आणि समजोता होणार का? हे पाहावे लागणार आहे. उद्यापासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी अजित पवारांसह सर्व मंत्री शरद पवारांना भेटायला पोहोचले आहेत. अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, प्रफुल पटेल हे सर्व नेते उपस्थित आहेत.
विरोधकांच्या बैठकीमध्ये सहभागी झालेले जयंत पाटील हे देखील बैठक सोडून वाय बी चव्हाण सेंटरच्या दिशेने रवाना झाले आहेत. सुप्रिया सुळे यांनी फोन करताच जयंत पाटील हे तातडीने वाय बी चव्हाण सेंटरकडे निघाले आहेत. जयंत पाटील यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड हे देखील आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी मंत्र्यांना आक्रमक न होण्याच्या सूचना देखील दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत या मंत्र्यांना शरद पवाराचा आशिर्वाद मिळणार का याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अजित पवार दुसऱ्यांदा भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या डबल गेमचा पुढचा अंक सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रतिभाताई पवारांना भेटण्याच्या निमित्ताने अजितदादा परवा सिल्वर ओक वर जाऊन आले. उद्या महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील 9 मंत्री शरद पवारांच्या भेटीला यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये पोहोचले.
शरद पवार एकीकडे उद्याच बंगलोर मध्ये विरोधी ऐक्याच्या बैठकीत सामील होण्यासाठी जाणार आहेत. त्याच्या आदल्याच दिवशी आज राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांना ते यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये भेटत आहेत. त्यामुळे पवारांच्या डबल गेमची देशात चर्चा सुरू होण्याबरोबरच विरोधी ऐक्यात ते खोडा घालतील, अशी चर्चा देखील वेग पकडत आहे.
जयंत पाटील. आव्हाड चव्हाण सेंटरकडे
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे चव्हाण सेंटरकडे जायला निघाले आहेत. चव्हाण सेंटरला कोण आलंय हे माहीत नाही. मला सुप्रिया सुळे यांचा फोन होता. त्यामुळे मी वायबी चव्हाण सेंटरकडे जात आहे, असं जयंत पाटील म्हणाले. मात्र, त्यांनी या भेटीवर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.
Leave a comment