136 ठेवीदारांची सात कोटी 29 लाखांची फसवणूक
बीड । वार्ताहर
ठेवीदारांना ज्यादा व्याजदर देण्याचे आमिष दाखवून लाखोंच्या ठेवी ठेवून घेत नंतर बँक दिवाळखोरीत निघाली असल्याचे सांगत ठेवीदारांची आर्थिक फसवणूक करणार्या जिजाऊ माँ साहेब मल्टिस्टेट को-ऑप के्रडिट सोसायटीच्या अध्यक्षांसह इतर सर्व कार्यकारणी मंडळाविरुध्द 3 जुलै रोजी रात्री बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत ठेवीदार अॅड.संतोष आप्पासाहेब जगताप (रा. चाणक्यपुरी, बीड) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार संस्थेच्या अध्यक्षा अनिता बबन शिंदे, त्यांचे पती बबन विश्वनाथ शिंदे, मनिष बबन शिंदे, योगेश करांडे, आश्विनी सुनील वांढरे, आणि बँकेचे सर्व कार्यकारणी मंडळ यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधानाचे कलम 406,409, 420, 120 ब, सहकलम भारतीय ठेवीदारांच्या (वित्त संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण )अधिनियम 1999 चे कलम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष जगताप यांनी तक्रारीत म्हटले आहे, जिजाऊ माँ साहेब मल्टिस्टेट को-ऑप के्रडिट सोसायटीमध्ये 23 मार्च 2023 रोजी 53 लाख 24 हजार 975 रुपयांची रक्कम मुदतठेव म्हणून ठेवलेली आहे. नंतर पैशाची वारंवार मागणी केल्यानंतर बँकेच्या अध्यक्षासह त्यांचे पती व इतर कार्यकारिणी मंडळाने पैसे परत करण्यास असमर्थता दर्शवत बँक दिवाळखोरीत गेल्याचे सांगत पैसे देण्यास नकार दिला. याच प्रमाणे इतर ठेवीदारांच्याही मुदतठेवी या बँकेने परत केलेल्या नाहीत. बँकेच्या एकूण 136 ठेवीदारांची 7 कोटी 19 लाख 27 हजार 987 रुपयांची आर्थिक फसवणूक जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेट को-ऑप के्रडिट सोसायटीच्या अध्यक्ष व इतर सर्व कार्यकारिणी मंडळाने केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
ठेवीदारांच्या रक्कमेचा अपहार करुन त्यातून त्यांनी पुणे जिल्ह्याच्या परिसरात 40 एक्कर जमिन, 2 फ्लॅट, तसेच औरंगाबाद व दिल्ली येथे प्रॉपर्टीमध्ये गुंतवल्याचे ऐकण्यात येते. बीडमध्ये पांगरी रोडवर 20 एक्कर जमिन तसेच त्या जागेवर त्यांची शैक्षणिक संस्था आहे. तर 17 एक्कर जागा सुध्दा सदरील इसमानेे बाजारभावापेक्षा कमी भावामध्ये रजिस्ट्री करुन ट्रान्सफर करुन ठेवल्या आहेत.याबरोबरच स्वत:च्या मालकीच्या कार, संस्थेच्या गाड्या, ट्रान्सफर करुन ठेवल्या आहेत. सदर बँकेत जिल्ह्यातील लोकांचे तब्बल 150 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत, व त्या ठेवी परत केल्या जात नाहीत असेही मला समजले असल्याचा आरोपही अॅड.संतोष जगताप यांनी शिवाजीनगर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत केला आहे. तुर्तास 136 ठेवीदारांची 7 कोटी 19 लाख 27 हजार 987 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाथरकर यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे.
आर्थिक व्यवहाराशी माझा संबंध नाही; न्यायालयीन लढाई लढणार-योगेश करांडे
जिजाऊ माँ साहेब मल्टिस्टेट को-ऑप के्रडिट सोसायटीतील आर्थिक व्यवहाराशी आपला काही एक संबंध नाही. मध्यंतरी आपण केवळ ठेवीदारांना त्यांचे पैसे पतसंस्थेकडून वेळेत देण्यासाठी कसे प्रयत्न सुरू आहेत, याबाबत माहिती दिली होती. अर्थात या पतसंस्थेच्या कुठल्याही पदावर आपण कार्यरत नाहीत. केवळ आपली बदनामी करण्यासाठी माझ्याविरुद्ध खोटी तक्रार दिली गेली आहे. या विरोधात आपण न्यायालयीन लढा लढणार आहोत अशी प्रतिक्रिया फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल झालेले योगेश करांडे यांनी ‘लोकप्रश्न’शी बोलताना व्यक्त केली.
Leave a comment