आयजींच्या आदेशानंतर डिवाएसपी धाराशिवकर यांच्या पथकाची कारवाई
बीड । वार्ताहर
तालुक्यातील पिंपळनेर ठाणे हद्दीतील घोडका राजुरी येथे एका गुटख्याच्या शेडमध्ये छापा मारुन पोलीसांनी 2 लाख रुपये किमतीचा विविध कंपन्याचा गुटखा जप्त केला. 3 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. महत्वाचे हे की, या ठिकाणी गुटख्याचे गोदाम चालवले जात असल्याची गुप्त माहिती थेट औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी तातडीने डिवायएसपी अभिजित धाराशिवकर यांना कारवाईच्या सूचना केल्या. नंतर अन्न व औषध प्रशासन अधिकार्यांसह पोलीसांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा मारुन गुटखा जप्त केला. या कारवाईत एकास जागीच पकडण्यात आले तर ज्याच्याकडून त्याने गुटखा खरेदी केला होता, त्यालाही आरोपी करण्यात आले.
अशोक धोंडिराम डरपे (23,रा.घोडका राजुरी,बीड) याच्यासह बाळासाहेब घुमरे (रा.मैंदा,ता.बीड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. अशोक डरपे याच्या घोडका राजुरी, वांगी रोडवरील शेत शिवारात एका शेडमध्ये महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित केलेल्या गुटख्याचा साठा असल्याची माहिती आयजी डॉ.चव्हाण यांना गुप्त खबर्याकडून मिळाली होती. त्यांनी कारवाईच्या सूचना देताच आष्टी विभागाचे डिवायएसपी अभिजित धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्यासह पोलीसांच्या पथकाने घोडका राजुरी शिवारातील गट नं.276 मधील शेडमध्ये 3 जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास छापा मारला. गोदामात पोलीसांना विविध कंपन्याचा गुटखा, पानमसाला, तंबाखु असा एकूण 2 लाख 3 हजार 574 रुपयांचा गुटखा आढळून आला. हा गुटखा बाळासाहेब मैद याच्याकडून घेतल्याची माहिती डरपे याने पोलीसांना दिली. कारवाईत डरपे यास अटक करण्यात येवून त्याच्या शेडमधील गुटखा जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरुध्द पिंपळनेर ठाण्यात अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 चे कलम 30 (2) (अ) सह भादंविचे कलम 272,273,278,328 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक निरीक्षक कैलास भारती हे करत आहेत.
Leave a comment