बीड । वार्ताहर
इन्फंट इंडिया या एचआयव्ही बाधितांसाठी काम करणार्या संस्थेतील काही विद्यार्थी जवळच असलेल्या पाली शाळेत शिक्षण घेत आहेत. मात्र या विद्यार्थ्यांमुळे आमच्या विद्यार्थ्यांना त्रास होता आहे.त्यांना शाळेबाहेर काढा.येथे त्यांना शिक्षण देवू नका असे निवेदन थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देत पाली येथील पालकांनी शाळेला कुलुप ठोकले. ही घटना 3 जुलै रोजी सकाळी घडली.एचआयव्ही बाबत जनजागृती केली जात असतानाही असा प्रकार घडल्याने आता प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
पाली (ता.बीड) येथे डोंगरावर इन्फंट इंडिया ही संस्था आहे.या ठिकाण एचआयव्हीग्रस्त मुलांचे पालन पोषण केले जाते. त्यांच्या शिक्षणाचीही सोय आहे .पाचवीपर्यंत शाळा देखील याठीकाणी आहे. यातील काही विद्यार्थी जवळच असलेल्या पाली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना त्रास होतो असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हा मुद्दा घेवून ग्रामस्थांनी इन्फंट इंडिया येथील मुलांनी त्यांच्याच संस्थेतील शाळेत शिक्षण घ्यावे , पाली येथील शाळेत शिक्षणासाठी येवू नये असे म्हणत थेट जिल्हा परिषदेच्या सिईओंना निवेदन दिले आहे. 3 जुलै रोजी तर पाली ग्रामस्थांनी एकत्र येत शाळाच बंदच केली.
निर्णय होत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवणार
बीड तालुक्यातील पाली येथील पालकांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जोपर्यंत इन्फंट इंडिया येथील मुलांची दुसरीकडे शिक्षणाची सोय केली जाणार नाही तोपर्यंत आम्ही शाळा सुरु होवू देणार नाही. तसेच इन्फंट इंडिया येथील मुले पाली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणासाठी येत असल्याने आमचे मुले भयभीत होत आहेत. जर त्यांची इतरत्र व्यवस्था केली नाही तर आम्ही आमचे मुलं दुसरीकडे शिक्षणासाठी पाठवू असेही काही पालकांचे म्हणणे आहे.
Leave a comment