राहुल दुबालेंच्या घरी गेले पण राजेंद्र मस्केंना टाळले
बीड । वार्ताहर
स्व.लोकनेते विनायक मेटे यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत कार्यक्रमास भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी दुपारीच हजेरी लावून आणि स्व.विनायक मेटे यांना अभिवादन करून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणारा अभिवादन सभेचा कार्यक्रम पंकजा मुंडेंनी टाळला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजेंद्र मस्केंच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत बैलगाडा स्पर्धेला जाण्याचे टाळले. कारण त्याठिकाणी पंकजा मुंडे उपस्थित होत्या. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेळ काढून पोलिस बॉईज संघटनेचा अध्यक्ष राहुल दुबाले याच्या घरी गेले मात्र राजेंद्र मस्केंना का टाळले? ते तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत. अशी चर्चा बीडमध्ये रंगली आहे.
लोकनेते विनायक मेटे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त शहरातील जालना रोडवर मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार अशा बातम्याही आल्या होत्या. ऐनवेळी मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस येणार असल्याने आणि नियोजीत कार्यक्रमही असल्यामुळे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी दुपारीच लोकनेते विनायक मेटे यांना अभिवादन करून आष्टीमध्ये पक्षाच्या टिफीन पार्टी कार्यक्रमाला हजेरी लावली.
त्यानंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत बैलगाडी स्पर्धेलाही हजेरी लावली. विशेष म्हणजे सकाळीच पंकजा मुंडे यांनी कार्यक्रम आटोपता घेवून आष्टीमध्ये हजेरी लावली होती. वास्तविक पाहता त्यांना आष्टीचा कार्यक्रम आधी करून दुपारी मस्केंच्या कार्यक्रमाला हजेरी लावून 4 वाजता फडणवीसांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे शक्य होते अशा भावनाही व्यक्त केल्या गेल्या. मात्र मुंडे-फडणवीस हे राजकीय द्वंद पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये स्पष्ट झाले आहे. नेत्यांनीच गटबाजी केली तर जिल्हा भाजपातील गटबाजी कशी संपेल? अशाही प्रतिक्रिया उमटल्या गेल्या.
मस्केंच्या बॅनरवर लक्ष्मण पवारांना टाळले
भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात आणि विशेषत: बीड शहरामध्ये हजारो डिजीटल बॅनर लावले होते. मात्र या बॅनरवर जिल्ह्यातील सर्व आमदारांचे आणि पदाधिकार्यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. मात्र गेवराईचे आ.लक्ष्मण पवार यांना बॅनरवर टाळले गेल्याची चर्चाही बीड आणि गेवराईमध्ये होती. विशेष म्हणजे गेवराईतील कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आ.लक्ष्मण पवार यांचे कौतुक करताना राज्यातील पहिल्या दहा आमदारांमध्ये आ.पवारांचा समावेश असल्याचे म्हटले होते.
स्वार्थी राजकारणासाठी मराठ्यांच्या भावनेशी खेळू नका
सकल मराठा समाजाचा पंकजाताईंना सल्ला
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही, असा निर्धार भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे. त्यावर भाजपचेच नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंकजा मुंडे यांना कानपिचक्या दिल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण हवंच आहे, पण त्याचा भावनिक मुद्दा करू नका, असा सल्ला राधाकृष्ण विखे यांनी पंकजा यांना दिला आहे. विखे-पाटील यांच्या नंतर सकल मराठा समाजाने तर थेट पंकजा मुंडे यांच्यावरच टीका केली आहे. पंकजाताई तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नका, असा सल्ला देत सकल मराठा समाजाने पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. मराठा समाजाकडून पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांच्यावर थेट टीका होत आहे.
Leave a comment