बकरी ईदची सुट्टी नेमकी कधी? राज्य सरकारच्या निर्णयाने घोळ मिटला
सुट्टी बुधवारी देण्याचा निर्णय शासनाकडून रद्द करण्यात आला आहे. तर बदलेल्या निर्णयानुसार आता ही सुट्टी आता गुरुवारी देण्यात आली आहे. शासनाकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शासनाकडून बुधवारी म्हणजेच 28 जून रोजी बकरी ईदची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. पण बकरी ईद ही गुरुवारी म्हणजेच 29 जून रोजी आहे. त्यामुळे बुधवारची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. तर ही सुट्टी बकरी ईदच्या दिवशीच म्हणजेच गुरुवारी 29 जून देण्यात आली आहे.
दरम्यान आषाढी एकादशीआणि बकरी ईद यंदा एकत्र आले आहेत. त्यामुळे शासनाकडून बकरी ईदची सुट्टी बुधवारी आणि आषाढी एकादशीची सुट्टी गुरुवारी जाहीर केली होती. परंतु हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने या सणांच्या सुट्ट्यादेखील एकाच दिवशी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता एकाच दिवशी सार्वजनिक सुट्टी मिळणार आहे.
काय आहे बकरी ईदचं महत्त्व?
मुस्लिम समुदायाचे लोक रमजान संपल्यावर किमान ७० दिवसांनंतर बकरी ईदचा सण साजरा करतात. याला ईद-उल-जुहा देखील म्हणतात. ईद-उल-फितर (मिठी ईद) नंतर मुस्लिम समुदायाच्या सर्वात मोठ्या सणांमध्ये एक आहे तो म्हणजे बकरी ईद. या दिवशी मुस्लिम बांधवांच्या घरी बकर्यांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. कुर्बानी दिल्यानंतर मांस समान तीन हिश्श्यांमध्ये गोरगरीब व अनाथ, आप्त व नातेवाईक आणि स्वत: व शेजारी यांना वाटप केले जाते. सकाळच्या विशेष नमाज पठणानंतर ही कुर्बानी देण्यात येते. मुस्लिम बांधवांमध्ये चंद्र दर्शनाला अत्यंत महत्त्व असते, त्यामुळे चंद्र दर्शनानंतर ईद साजरी केली जाते.
त्यानुसार, बकरी ईद २९ जून रोजी येत आहे. परंतु, राज्य सरकारने २८ जून रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. याबाबत काँग्रेस नेते नसीम खान आणि मुदास्सर पटेल यांनी सुट्टीची तारीख बदलण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांना विनंती केली होती. ही विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली आहे. २८ जूनची सार्वजनिक सुट्टी रद्द करून २९ जून रोजी करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन आदेश सामान्य प्रशासन विभागाचे सह सचिव सो.ना.बागुल यांनी २६ जून रोजी जारी केला आहे.
Leave a comment