बीड | वार्ताहर
गायरान आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश नुकतेच न्यायालयाने दिलेले आहेत. मात्र राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवू नका तर ते कायम करा या मागणीसाठी आपण जनआंदोलन उभारणार असल्याची माहिती बहुजन विकास मोर्चाचे प्रमुख बाबुराव पोटभरे यांनी आज 10 मे रोजी बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या बरोबरच त्यांनी जिल्ह्यातील भ्रष्टाचारावरही भाष्य केले. ते म्हणाले, जिल्ह्यात गत तीन वर्षात भ्रष्टाचार बोकाळला असून कृषी आणि वन विभागात शेकडो कोटींच्या निधीचा भ्रष्टाचार झाला आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही. प्रशासन निगरगठ्ठ आहे कारण लोकप्रतिनिधीही यात सहभागी आहेत असा थेट आरोपही पोटभरे यांनी केला.
यावेळी बाबुराव पोटभरे म्हणाले, महाराष्ट्रात 15 लाख हेक्टर जमिन प्रस्तापित लोकांनी कारखान्यांसाठी अधिगृहीत केली आहे. यात शिक्षण संस्था, सुतगिरणी, सहकारी साखर कारखाने उभारण्यात आले. आता शासन गायरानावरील अतिक्रमण हटवू पाहत आहे. असे करण्यापूर्वी शासनाने प्रस्तापित लोकांनी बळकावलेल्या जमिनी सोडविण्यासठी त्यांना आधी नोटीस द्यावी मात्र तसे न करता पत्र्याचे शेड उभारून उपजिवीका भागविणार्यांना नोटीस पाठवून हैराण केले जात आहे. कसेल त्याची जमिन आणि राहील त्याचे घर ही घोषणा अनेक वर्षांपूर्वी दादासाहेब गायकवाड यांनी केली होती. आता याच घोषणेचे सुत्र शासनाने अंगीकारण्याची गरज आहे अशी मागणीही पोटभरे यांनी केली.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. पाणी पुरवठा विभाग असो की कृषी विभाग, अन्नधान्य असो की बांधकाम विभाग सगळीकडे भ्रष्टाचार सुरू आहे आणि याला कारणीभूत लोकप्रतिनिधी आहेत. लोकप्रतिनिधीकडून टक्केवारी सुरू झाली. त्यामुळे जिल्ह्याचा विकास झालाच नाही मात्र लोकप्रतिनिधीची भरभराट झाली.याबाबतचे पुरावेही आप वेळप्रसंगी सादर करू. गायरान जमिनीच्या मुद्यावर आपण जनआंदोलन उभारू, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रशांत ससाणे, जयदीप तांगडे, विनोद शिंदे, श्रीहरी मोरे, मुरलीधर साळवे, नवनाथ धाईजे, निलेश थिटे, बाबासाहेब वाघमारे आदिंची उपस्थिती होती.
Leave a comment