बीड | वार्ताहर
तालुक्यातील पिंपळनेर ठाणे हद्दीतील भवानवाडीत 9 मे रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली. मात्र प्रोसेडिंग पूर्ण करण्याचा मुद्दा आणि आरडाओरड व शिवीगाळ यामुळे ही ग्रामसभाच उधळली गेली. दोन्ही गट शांत होत नसल्याने अखेर हे प्रकरण पिंपळनेर ठाण्यात पोहोचले. तिथे दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांविरूध्द तक्रारी नोंदवल्या. त्यावरून 12 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भवानवाडीचे सरपंच गणेश नवनाथ जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, 9 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता गावातील हनुमान मंदिरासमोरील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा सुरू होती. यावेळी आरोपी हनुमंत जगताप, प्रताप जगताप, प्रकाश जगताप, बिभीषण जगताप, काशिनाथ जगताप व हरिदास जगताप हे तिथे आले. त्यांनी ग्रामसभा सुरू असतांना आरडाओरडा करत सरपंच गणेश जगताप व ग्रामसभेतील सदस्यांना शिवीगाळ करून ग्रामसभा बंद पाडली. तसेच हनुमंत जगताप व प्रताप जगताप या दोघांनी सरपंचांच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. यावरून 6 जणांविरूध्द गुन्हा नोंद झाला.
दरम्यान हनुमंत मनोहर जगताप यांनीही फिर्याद नोंदवली. त्यानुसार ग्रामसभेला आम्ही हजर असतांना 54 लोकांनी हजर होऊन रजिस्टरवर सह्या केल्या. परंतु ग्रामसभेसाठी किमान 100 जणांच्या सह्या लगतात. यावरून ग्रामसेवकांनी सदरची सभा तहकूब केली. तसेच यावेळी तुमची प्रोसेडिंग पूर्ण करा त्यानंतर आम्ही जातो असे हनुमंत जगताप ग्रामसेवकास म्हटले असता सरपंच गणेश जगताप, बालासाहेब मुंंढे, मच्छिंद्र मुंढे, शेषेराव राठोड, अशोक जगताप व रामेश्वर जगताप यांनी गैर कायद्याची मंडळी जमवत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून त्यांच्याविरूध्द गुन्हा नोंद झाला. या दोन्ही प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार शेख करत आहेत.
Leave a comment