बीड | वार्ताहर
घरासमोर येऊन दागिणे लांबविण्याचे प्रकार आता बीडमध्ये वाढू लागले आहेत. शहरातील अंकुशनगर भागातील माऊली नगर येथे सोने आणि चांदीचे दागिणे उजळून देतो असे सांगत एका महिलेकडील 80 हजाराचे दागिणे हातोहात लंपास करत फसवणूक केली गेली.9 मे रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
सोन्या-चांदीचे दागिणे उजळून देण्याचे अमिष दाखवत यापूर्वीही बीड शहरात महिलांकडील किंमती दागिणे चोरट्यांनी लांबविल्याचे प्रकार घडलेले आहेत. असाच प्रकार मंगळवारी दुपारी अंकुशनगर भागात घडला. 2 अनोळखी भामटे अंकुशनगर भागातील मंगल सुरेश सानप यांच्या घरासमोर आले. त्यांनी मंगल सानप यांच्यासह त्यांच्या सासूचा विश्वास संपादन करून घेत दागिणे उजळून देतो असे सांगितले. त्या दोघांवर विश्वास ठेवत सानप सासू-सुनेने त्यांच्याकडे 80 हजार रूपये किंमतीचे दागिणे सोपवले.
मात्र तोतयागिरी करत दोन भामट्यांनी ते दागिणे स्वतःकडे ठेऊन घेत सानप यांच्याकडे दुसरेच दागिणे देऊन त्यांची फसवणूक केली. फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर मंगल सानप यांनी शिवाजीनगर ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली. त्यावरून दोन अज्ञाताांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक फौजदार वासूदेव मिसाळ अधिक तपास करत आहेत.
Leave a comment