माजलगाव । उमेश जेथलिया
माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालानंतर जरी आ प्रकाश सोळंके यांच्या एकहाती वर्चस्वाला जोर का झटका...धिरेसे लगेचा प्रत्यय आला असला तरी माजलगावच्या राजकारणातील सगळ्या तंबूत खुशीचे वातावरण असून आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडेचा प्रत्यय येत आहे.
माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत आ प्रकाश सोळंके यांचे 18 ला 18 जागा जिंकण्याचे स्वप्न जरी भंगले असले तरी 12 जागा जिंकून पुन्हा एकदा कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात ठेऊन सलग 25 वर्ष कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात राहिल्याचा आनंद त्यांच्या गोटात आहे.तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण गटात आमदार पुत्रापेक्षा 3 मतदान जास्त मिळाल्याचा तसेच मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद वाचल्याचा आनंद अशोक डाक यांच्या गोटात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ. प्रकाश सोळंके व पॅनलचा पहिल्यानदाच घाम काढल्याचा व निसटता पराभव असला तरी बचेंगे तो और भी लढेगे वाली वृत्ती ठेऊन येणार्या न.प. नवडणुकीत आ. प्रकाश सोळंके ची पाठ लोळवू शकतो याचा आत्मविश्वास आल्यामुळे मोहन जगताप व कंपूत आनंद आहे.
सोबत नितीन नाईकनवरे यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीत घुसण्याचे स्वप्न दणदणीत विजय मिळवून पूर्ण होत असल्याचा आनंद त्यांच्या कंपूत आहे. तर आडसकर कंपूत प्रयत्न करून ही नितीन नाईकनवरे निवडून आल्याचे दुःख असले तरी कृषी उत्पन्न बाजार समिती नितीन नाईकनवरे व मोहन जगताप यांच्या ताब्यात न आल्याचा आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. तर माजी आ राधाकृष्ण होके पाटील यांनी व्यापारी मतदारसंघात दोन उमेदवार उभे केले व दोन्ही उमेदवार विजयी झाल्याचा आनंद होके परिवारात असून हा विजय त्यांच्या साठी नवसंजीवनी देणारा ठरणार आहे.एकूणच कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या निवडणुकीत जरी अपेक्षित यश सोळंके व जगताप दोघाना ही मिळाले नसले तरी मतदारांनी दोघांना खुश करून लोकशाही जिवंत असल्याचे सिद्ध केले आहे.
Leave a comment