वीजेच्या धक्क्याने चौघे जखमी,घर,दुकानावरील पत्रे उडाले
तहसीलदार सुहास हजारेंनी रुग्णालयात जावून केली जखमींची विचारपूस
बीड । वार्ताहर
बीड तालुक्यात शनिवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत अवकाळी पाऊस आणि गारांच्या तडाख्याने हाहा:कार उडवला. या घटनेत करचुंडी, फुकेवाडी येथे घर आणि दुकानावरील पत्रे उडून गेले तर मांजरसुंबा, घोसापुरी येथे वीजेच्या धक्क्याने चौघे जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तहसीलदार सुहास हजारे यांनी दिली.
करचुंडी येथे वादळी वार्यामुळे व पावसामुळे शेख हुसेन यांच्या घरावरील व दुकानावरील पत्रे उडून गेली आहेत. याव्यतिरिक्त करचुंडीमध्ये वादळी वार्यामुळे व पावसामुळे दुसरी कोणतीही जीवित हानी नाही. तसोच फुकेवाडी येथे घरावरील पत्रे उडाले तर मांजरसुंबा (ता.बीड) येथे श्रीराम बाळू चोरमले आणि तुळशीराम बाळू चोरमले हे दोघे विजेचा धक्का लागून जखमी झाले आहेत. त्यांच्यावर दीप हॉस्पिटल बीड येथे उपचार सुरू असून दोघांची प्रकृती स्थिर आहे.
मौजे घोसपुरी येथील सुनिता विनोद कुटे (वय 45) व श्रीहरी गिण्यानदेव कुटे (वय 75) यांचे अंगावर वीज पडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व जखमींची तहसीलदार सुहास हजारे यांनी रुग्णालयात जावून आस्थेवाईकपणे विचारपूस केले. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान मौजे ढेकनमोहा येथील शेतकरी भीमा सूर्यभान थापडे यांचा बैल वीज पडून मृत झाला. तिप्पटवाडी येथेही अशीच घटना घडली शेतकरी श्रीहरी गिण्यानदेव कुटे यांचे 2 बैल अंगावर विज पडून मयत झाले. अवकाळी पाऊस, गारपीट आणि विजा कोसळून शेतकर्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.
Leave a comment