कांदा उत्पादकासाठी आ.सुरेश धस यांनी घेतला पुढाकार; मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांना देणार पत्र
आष्टी | वार्ताहर
(प्रतिनिधी)- पणन महासंचालनालयाने कांदा उत्पादक शेतकर्यांना 29 मार्च रोजीच्या पत्रानुसार 7/12 वर ई-पिक नोंदणी करण्यात आलेली असावी अशी अट घातल्याचे आम्हाला समजले आहे. महत्वाचे हे की, बहुतांश शेतकर्यांनी ई-पीक नोंदणी केलेली नाही. त्यामुळे शेतकर्यांना कांदा अनुदान मिळावे यासाठी ई-पीक नोंदणी ऐवजी बाजार समितीची विक्री पावती ग्राह्य धरावी अशी मागणी आ.सुरेश धस यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात आ.धस यांनी म्हटले आहे की, सन 2022-23 या चालू वर्षी राज्यात फेब्रुवारीच्या सुरुवातीला कांद्याच्या बाजारभावात प्रचंड घसरण झाल्याने शेतकर्यांना मदतीचा हात म्हणून कांदा उत्पादक शेतकर्यांना अनुदान जाहीर करण्यात आले आहे.1 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्ती धारक, अथवा नाफेड कडून खरीप कांदा खरेदी करण्याकरता उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रामध्ये विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकर्यांना अनुदान देण्या बाबत निर्णय झालेला आहे.यामुळे शेतकरी समाधानी आहे.परंतु 29 मार्च रोजी संचालक, पणन महासंचालनालय, पुणे यांनी कांदा उत्पादक शेतकर्यांच्या सातबारावर ई पीक नोंदणी करण्यात आलेली असावी अशी अट घालण्यात आली आहे असे समजते. तथापि, बहुतांश शेतकर्यांनी ई-पीक नोंदणी केलेली नाही आणि नोंदणी करण्यासाठी संबंधित वेबसाईटवर नोंदणी करताना सर्वर डाऊन असल्यामुळे यापुढे ही पीक नोंदणी मुदतीत करणे अवघड होणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांच्या सातबारावरील ई-पीक नोंदणी ऐवजी कृषी उत्पन्न बाजार समितीची विक्री केल्याची पावती ग्राह्य धरावी आणि त्याच आधारे शेतकर्यांना अनुदान देण्यात यावे अशी मागणी आ.सुरेश धस यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. आज सायंकाळी आ.धस हे पत्र मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री महोदयांना देणार आहेत.
Leave a comment