बीड । वातार्हर
एका ग्राहकाला वीज जोडणी न देताच वीज बीलाची आकारणी करणे महावितरण कंपनीला महागात पडले आहे. झालेल्या अन्यायाविरुध्द ग्राहकाने ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली. आयोगाने तक्रारदाराच्या बाजूने निकाल देत 34 हजार रुपयांचे बील रद्द करुन तक्रारदारास नुकसान भरपाई तसेच तक्रारीचा खर्च देण्याचे आदेश दिले आहेत. हा निकाल महावितरणसाठी मोठा झटका मानला जात आहे.
नवनाथ गणपत कुडुक (रा.तितरवणी ता.गेवराई) यांनी ऑक्टोबर 2013 मध्ये 3 एचपी मीटरसाठी कोटेशन भरले होते.परंतु विद्युत वितरण कंपनीने कनेक्शन दिले नाही.नंतर वारंवार तक्रारदाराने विज वितरण कंपनीकडे मागणी केली परंतु कनेक्शन मिळाले नाही. शेवटी नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांना रक्कम 34 हजार रुपयांचे बील वितरण कंपनीने दिले. त्यामुळे तक्रारदाराने विज वितरण कंपनी विरोधात ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे वकीलामार्फत तक्रार दाखल केली.
ग्राहक मंचाने तक्रारदाराचे 34 हजार रुपयांचे बील रद्द केले. तसेच ऑक्टोबर 2013 पासुन वीज जोडणी देईपर्यंतच्या काळातील प्रत्येक आठवड्यास 100 रुपये या दराने नुकसान भरपाई, शासकीय व मानसिक कामापोटी 5 हजार व तक्रारीचा खर्च म्हणुन रक्कम रुपये 1 हजार तक्रारदारास देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात तक्रारदाराच्या वतीने अॅड.एल.ए.पोपळे यांनी काम पाहिले. या प्रकरणात अॅड. व्ही.एन.मुळे यांनी अॅड.पोपळे यांना मार्गदर्शन केले व अॅड.व्हि.बी. शेळके,अॅड.रोहन साळवे व अॅड. विश्वजीत काळे यांनी सहकार्य केले.
Leave a comment