लाभार्थी शेतकर्यांनी बँक खाते आधार क्रमांकास जोडणे आवश्यक
बीड । वार्ताहर
पी.एम. किसान योजनेचा हप्ता मिळण्याची सुविधा आता गावातच पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी लाभार्थी शेतकर्यांनी आय.पी.पी.बी. खात्याशी आधार लिंक असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत अनेक लाभार्थ्यांची बँक खाती आधार क्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे 1 ते 12 फेब्रुवारी दरम्यान राज्यात मोहिम हाती घेण्यात आली असून गावातील पोस्टमास्तर लाभार्थ्यांना संपर्क करून आय.पी.पी.बी.मध्ये बँक खाती सुरु करणार आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेतंर्गत पात्र शेतकरी कुटुंबास तीन हप्त्यात 2 हजार रुपये याप्रमाणे वर्षाला 6 हजार रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेचा तेरावा हप्ता जमा करण्याची कार्यवाही सध्या सुरु आहे. त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक आहे. यासाठी 1 ते 12 फेब्रुवारी दरम्यान त्यासाठी मोहिम राबविण्यात येत आहे. आजघडीस बीड जिल्हात एकूण लाख 66,148 लाभार्थ्यांची बँक खाती आधार क्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे या मोहिमेतंर्गत या लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आय.पी.पी.बी. मार्फत उघडण्याची व ते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातील पोस्ट मास्तरमार्फत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी आधारकार्ड व मोबाईल क्रमांक आवश्यक असणार आहे. ज्यांचे खाते उघडले गेले नाही, त्यांचे खातेही उघडून देण्यात येणार आहे. ते बँक खाते आधार क्रमांकाशी 48 तासात जोडले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा डाक अधिक्षक कुंदन भ. जाधव यांनी दिली.
पीएम किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाते आय.पी.पी.बी. मध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी आय.पी.पी.बी. कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. गावातील पोस्टमास्तर या लाभार्थ्यांना संपर्क करुन आय.पी.पी.बी.मध्ये बँक खाती सुरु करतील. आय.पी.पी.बी मार्फत आयोजित या मोहिमेमध्ये प्रलंबित लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहन बीड जिल्हा डाक अधिक्षक कुंदन जाधव यांनी केले आहे.
==========
Leave a comment